Mahaparinirvan Din - महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुटटी जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2023

Mahaparinirvan Din - महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुटटी जाहीर


मुंबई -  भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी येथे लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्याने नेहमीच येथे गर्दी असते. त्यात मुंबईत आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांना सोयी सुविधा उपलब्ध करून देताना शासकीय यंत्रणांवर ताण येतो. यासाठी  ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी आंबेडकरी संघटनांकडून केली जात होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने ६ डिसेंबर रोजी मुंबई आणि उपनगरात सरकारी, निमसरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.  

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ डिसेंबर २०२३ रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यात सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी "अनंत चतुर्दशी" या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२३ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील असे परिपत्रकात म्हटले आहे. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२०५१५३३३५८६०७ असा आहे.

दरम्यान नुकतीच भीम आर्मी या संघटनेने ६ डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने ही सुट्टी जाहीर केल्याने भीम आर्मी तसेच इतर आंबेडकरी संघटनांनी सरकारचे आभार मानले आहेत.

समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आणि मुंबई उपनगरे या दोन्ही जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीकडून अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र ही मागणी प्रलंबित होती. यंदा समितीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुटी जाहीर करण्याबाबत विषय मांडला. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, खासदार पूनम महाजन, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दिलीप लांडे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार वर्षा गायकवाड आदींकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे समन्वयक नागसेन कांबळे आणि पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. तसेच सदर मागणीला शिफारस करण्याची विनंती केली. समितीची मागणी आणि लोकप्रतिनिधींनी केलेली शिफारस लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाकडून बुधवार दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगरे जिल्ह्यात एक दिवसाची स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तसेच पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आभार मानल्याचे समन्वयक नागसेन कांबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad