२५ डिसेंबरला नागपुरात वंचितच्या स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2023

२५ डिसेंबरला नागपुरात वंचितच्या स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन


मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासारख्या धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटना या विभाजनवादी विचारांना पेरण्याचे काम करत आहेत. समाजाला तोडण्याचे आणि विभागण्याचे काम इथे सुरू आहे. या देशात जर सर्वसमावेशक सामाजिक व्यवस्था निर्माण करायची असेल, सर्वसमावेशकतेच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र आणायचे असेल तर काय केले पाहिजे? या संदर्भातील आराखडा हा नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे २५ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेत मांडण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून इथली विषमतावादी, विभाजनवादी व्यवस्था नाकारली होती. मनुस्मृती दहन दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 27 वर्षापासून राज्यभरात भारतीय स्त्री मुक्तीदिन परिषदेचे आयोजन केले जाते. मनुस्मृती ही हिंदू व भारतात आलेल्या इतर धर्मातही विषमतावादी आणि विभाजनवादी सामाजिक व्यवस्था निर्माण करते. तर राज्यघटनेच्या माध्यमातून संत चार्वाक, बुद्ध, महावीर, गुरु नानक, संत कबीर, संत रविदास, संत एकनाथ, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव या संताना अभिप्रेत असलेली समताधिष्ठित आणि सर्वसमावेशक सामाजिक व्यवस्था निर्माण करणे ही इथल्या सर्व राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांची जबाबदारी होती, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

संविधानाने संपूर्ण समतेची हमी दिली तरी आजही आपल्या देशातील राजकिय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था प्रचंड विषमतेची आहे. कायदा संविधानाचा परंतू व्यवस्था मनुस्मृतीची आहे. लोकसभा विधानसभांमध्ये महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. महिलांमधील शिक्षणाचे प्रमाण चिंताजनक रित्या कमी आहे. दलित, आदिवासी, ओबीसी स्त्रिया गरीबी, बेकारी, निरक्षरता, अत्याचार व भेदभावाच्या बळी आहेत. कारण, आजही ब्राह्मणी वर्चस्वाची व्यवस्था मजबूत आहे. अशा सामाजिकदृष्ट्या गंभीर मुद्द्यांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

नागपुरात होणाऱ्या स्त्री मुक्ती दिन परिषदेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad