मुंबई - शिंदे सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबई मनपाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अडचण होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. हिंमत असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता तुमच्या कामांचे ऑडिट करेल, असा हल्ला ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्याला शिंदे सरकारकडून मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. यामुळे महानगरपालिकेवरुन शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले आहे.
कोव्हीड काळात मुंबई महानगरपालिकेत झालेला गैरव्यवहार समोर आला आहे. तसेच इतर अनेक गैरव्यवहाराचे आरोप होत आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई मनपाच्या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी श्वेतपत्रिका काढणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. त्यानंतर विरोधकांनी पुणे, ठाणे, नागपूर आणि इतर मनपाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, मुंबई मनपाच्या चौकशीचा निर्णय होताच इतक्या मिर्च्या का झोंबल्या. कोव्हीड सेंटरमध्ये घोटाळे सर्वांसमोर आले. मुंबईनंतर ज्या ठिकाणी आरोप होती, त्या पालिकेची चौकशी केली जाईल. तुम्ही स्वच्छ असाल तर घाबरण्याची गरज काय? अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment