मुंबई - मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या (Banganga lake) जीर्णोद्धार प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज (दिनांक १८ डिसेंबर २०२३) झाले.
या भूमिपूजनप्रसंगी डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बाणगंगा परिसराच्या स्वच्छतेसाठी आणलेल्या क्लिनिंग व्हॅनचे देखील लोकार्पण यानिमित्ताने करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धारासाठी विविध कामे केली जाणार आहेत.
जीर्णोद्धार कामांमध्ये बाणगंगा तलावासभोवतालचा परिसर, रामकुंडालगतच्या परिसराची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्यांची तसेच संरक्षक भिंतींची आणि दीपस्तंभाची दुरुस्ती व जीर्णोद्धार, तलावाचे आतील बांधकाम काढणे, बटरफ्लाय झडप दुरुस्ती आणि सुधारणा अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. पालकमंत्री लोढा यांनी तलाव परिसरातील बांधकामे हटवून तलावाचा पुरातत्व वारसा जपण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेला निर्देश दिले होते. त्यानुसार या जीर्णोद्धार कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
वारसा स्थळांच्या यादीत ‘श्रेणी – १’मध्ये समाविष्ट असणाऱ्या या परिसराला जीर्णोद्धार कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन व आकर्षक रूप लाभणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभाग कार्यालयाच्या वतीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे यांच्या संनियंत्रणात 'डी' विभागातील विविध ऐतिहासिक ठिकाणांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. याच अंतर्गत बाणगंगा तलाव परिसर जीर्णोद्धाराचाही समावेश आहे. हा प्रकल्प "विशेष प्राधान्य प्रकल्प" म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील एक रस्ता 'भक्ती मार्ग' म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर साजेसे माहिती फलक, आकर्षक पथदिवे, वाराणसीतील विकास प्रकल्पाच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, विहार मार्ग (Promenade) इत्यादी बाबी देखील या प्रकल्पांतर्गत साकारण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तलाव परिसरातील पुरातन वास्तुंचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहेत, अशी माहिती 'डी' विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे. सदर कामे ही पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाच्या संचालनालय यांच्या मार्गदर्शनानुसार व मुंबई वारसा संवर्धन समिती यांच्याशी समन्वय साधून करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment