५० तासांच्या अथक प्रयत्नानंतर जलवाहिनीचे काम पूर्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 December 2023

५० तासांच्या अथक प्रयत्नानंतर जलवाहिनीचे काम पूर्ण


मुंबई - अंधेरी पूर्व येथे वेरावली - ३ सेवा जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱया, १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्ती करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चमूने सुमारे ५० तासांच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ण केली आहे. अतिशय आव्हानात्मक अशा परिस्थितीत ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आता संबंधित बाधित परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज (दिनांक ४ डिसेंबर २०२३) सायंकाळपासून पाणीपुरवठा व्हायला सुरूवात होईल. दरम्यान, या जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱया संबंधित कंत्राटदाराला नोटीस पाठवून आवश्यक ती दंड वसूली देखील केली जाणार आहे. 

सदर जलवाहिनी दुरुस्ती कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार दुरूस्ती कामाच्या ठिकाणी उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर,  जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांचेसह अधिकारी, कर्मचारी, कामगार मिळून तब्बल शंभरपेक्षा जास्त मनुष्यबळ तळ ठोकून होते. या सर्वांच्या अथक व अहोरात्र केलेल्या प्रयत्नामुळेच ही जलवाहिनी दुरूस्ती योग्यरितीने पूर्ण करणे शक्य झाले. 

जलवाहिनी दुरूस्तीसाठी तयार केले दोन मॅनहोल -
अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ जवळ गुरुवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ड्रिलिंग काम सुरु असताना, वेरावली सेवा जलाशयाच्या १८०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली. मुख्य जलवाहिनीला वरून नव्हे तर आजूबाजूने आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी छिद्र होऊन गळती लागली. परिणामी वेरावली क्रमांक १, २ आणि ३ तसेच घाटकोपर अशा चार सेवा जलाशयांतून होणाऱया पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. महानगरपालिका प्रशासनाने सदर जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले. जल वाहिनीच्या आत सातत्याने पाणी येत असल्याने आतून दुरुस्ती करणे शक्य नव्हते. त्यामुळे बाहेरून दुरूस्तीसाठी जलवाहिनीला दोन मॅनहोल तयार करण्यात आले.

विविध कारणांमुळे जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम ठरले अतिशय खडतर आणि आव्हानात्मक - 
या जलवाहिनीची दुरुस्ती ही एरवीच्या दुरुस्ती कामांपेक्षा वेगळी, अतिशय खडतर व आव्हानात्मक होती. कारण की, ज्या ठिकाणी गळती लागली ती जलवाहिनी जमिनीत सुमारे सहा मीटर खोल आहे. तसेच या परिसरात अलीकडे बांधकाम झाल्यानंतर जमिनीचा भराव पूर्ववत केलेला असल्याने तुलनेने त्याची भूगर्भीय पकड सैल आहे. त्यामुळे अधून मधून ती माती देखील गळती झालेल्या खड्ड्यात कोसळत होती. स्वाभाविकच मुख्य जलवाहिनी पूर्ण रिकामी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण पाण्याचा उपसा करणे आणि त्याचवेळी दुरुस्तीसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी भूस्खलन होऊ न देणे, हे अतिशय मोठे आव्हान पेलून दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. एवढेच नव्हे तर या जलवाहिनीला वरून नव्हे तर आजूबाजूने आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी छिद्र होऊन गळती लागली होती. त्यामुळे जलवाहिनी पूर्ण रिती करुन आत शिरून ही सर्व छिद्र बंद करावी लागणार होती. मात्र, पाणी पूर्णपणे बाहेर काढणे शक्य होत नसल्याने बाहेरच्या बाजुने ही गळती बंद करण्याचे काम करावे लागले.

बाधित भागांमध्ये २४६ पेक्षा अधिक टॅंकर फेऱयांद्वारे पाणीपुरवठा-
पश्चिम उपनगरांमध्ये पाणीपुरवठा बाधित झालेला परिसर अधिक होता. या भागांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वतःचे टँकर वापरून ६९ फेऱया आणि खासगी टँकरच्या १७७ फेऱया असे मिळून एकूण २४६ फेऱया करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय एल आणि एन विभागामध्ये देखील नागरिकांना टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवण्यात आले.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न-
आज दुपारच्या सुमारास जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार करून सेवा जलाशय भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सेवा जलाशय भरुन के पूर्व, के पश्चिम, एच पश्चिम, एन आणि एल विभागात आज सायंकाळपासून टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा केला जाईल. दैनंदिन पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी काहीसा कालावधी लागू शकतो, तोवर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तोवर कृपया नागरिकांनी संयम राखावा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावणार- 
मेट्रो प्रकल्पाचे ड्रिलिंग काम सुरु असताना या जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली होती. सर्वात महत्वाचे प्राधान्य दुरुस्तीला असल्याने महानगरपालिकेचा जल अभियंता विभाग त्याचप्रमाणे विभाग कार्यालयांची संपूर्ण यंत्रणा दुरुस्ती कार्यवाहीसाठी तैनात होती. शनिवार, दिनांक २ डिसेंबर २०२३ आणि रविवार, दिनांक ३ डिसेंबर २०२३ असे दोन दिवस साप्ताहिक सुटी देखील होती. आज कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, आता संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये जलवाहिनीला पोहोचलेले नुकसान, दुरुस्तीसाठी सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर केलेला खर्च, वाया गेलेल्या पाण्याचा नियमानुसार आकार व दंड अशी सर्व मिळून रक्कम गणना केली जाईल आणि त्याची वसुली संबंधिताकडून करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad