जनमताच्या मैदानात समोर येऊन लढा, काँग्रेसचे भाजपाला आव्हान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2024

जनमताच्या मैदानात समोर येऊन लढा, काँग्रेसचे भाजपाला आव्हान


मुंबई - ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी झाली आहे. कर चुकवेगिरी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने काँग्रेसची ११ बँक खाती गोठवली असून गुरुवारी सुमारे १८०० कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत जनमताच्या मैदानात समोर येऊन लढण्याचे आव्हान भाजपाला दिले आहे.

गल्लीबोळात क्रिकेट खेळताना एखादा चिडका आणि रडका मुलगा आपण सामना हरत असल्याचे कळताच दुस-याची बॅट, स्टम्प, चेंडू घेऊन जसा पळ काढतो, अगदी तशी गत भाजपाची झाली आहे, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली आहे. काँग्रेसच्या न्याय यात्रेत खंड पाडण्यासाठी भाजपाने स्वत:कडची होती-नव्हती ती सगळी शक्ती पणाला लावली, पण काँग्रेसने केवळ जनतेपर्यंत न्यायाचा संदेश पोहोचवलाच नाही, तर जनताही या लढाईत काँग्रेसच्या हातात हात देत आता सोबत उभी राहिली आहे. ही गोष्ट भाजपाला चांगलीच ठाऊक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इलेक्टोरल बॉण्ड हा महावसुली घोटाळा उघड झाल्यानंतर भाजपवाले आणखीन घाबरले आहेत. भाजप आता बावरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळेच मोदी सेना प्रत्येकवेळी एजन्सींना पुढे करत विरोधकांची गळचेपी करण्याचे कुटील डाव सतत खेळत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असताना प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला चुकीच्या पद्धतीने दंड ठोठावून लक्ष्य केले जात आहे. मागील १० वर्षे भाजपाची सत्ता असूनही ऐन निवडणुकीच्या तोंडावर ३० वर्षे जुन्या प्रकरणांवर प्राप्तिकर विभागाकडून ही कारवाई का केली जात आहे? चुकीच्या पद्धतीने खाती गोठवण्यात आली. न्यायाच्या लढ्यासाठी सर्वसामान्यांनी जमा केलेले १३५कोटी रुपये काँग्रेसच्या बँक खात्यातून काढण्यात आले आणि आता १८०० कोटी रुपयांची नोटीसही जारी करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दुस-या बाजूला भाजपाने नियमांची पायमल्ली करत ४२ कोटी रुपयांची देणगी देणा-या १२९७ देणगीदारांचे नाव किंवा पत्त्याचे विवरणपत्र देखील सादर केले नाही. मात्र प्राप्तिकर विभाग या विषयावर मौन बाळगून आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. एकूणच, भाजपाला पराभवाची भीती वाटत आहे, हे स्पष्ट आहे. मुक्त आणि निष्पक्षपणे निवडणुका व्हाव्यात, अशी त्यांची अजिबात इच्छा नाही. भाजपा नेत्यांनी इतके घाबरू नये, पाठीत वार करणे सोडावे, असे सांगतानाच, जनमताच्या मैदानात समोर येऊन लढण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad