
मुंबई - उघड्या गटारात खाजगी कंत्राटदाराचे पाच कामगार पडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री २.४९ वाजता शिवडी वाडी बंदर येथे घडली. या दुर्घटनेत उघड्या गटारातील गॅसमुळे गुदमरुन मेहबूब इस्माईल (१९) या कामगाराचा मृत्यू झाला असून उर्वरित चार कामगारांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.
हाजी बंदर रोड, एल अँड टी गेट नंबर १, रुपजी कानजी चाळ, शिवडी येथे खाजगी कंत्राटदाराचे पाच कामगार उघड्या गटारात पडले. बॉक्स ड्रेनचे काम सुरू असताना ही घटना घडली. यात मेहबूब इस्माईल (१९) याचा मृत्यू झाला. तर सलीम (२५) याची प्रकृती गंभीर असल्याचे केईएम रुग्णालयाकडून सांगण्यात आले. शफाकूल (२२), कोरेम (३५) व मोसलेन (३०) या तिघांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment