वॉशिंग्टन - काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्कच्या ‘न्यूरालिंक’ प्रोजेक्टमध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती. मेंदूमध्ये चिप बसवलेल्या एका रुग्णाने चक्क केवळ विचारांच्या मदतीने संगणकावर बुद्धीबळ खेळून दाखवले होते. यानंतर आता न्युरालिंकच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा मस्कने केली. आता मस्क अंध व्यक्तींना दृष्टी देण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. न्यूरालिंक कंपनीच्या अंतर्गत मस्क हा नवा प्रोजेक्ट सुरू करत आहे. या माध्यमातून आम्ही जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तींना देखील दृष्टी प्रदान करू शकतो, असा दावा इलॉन मस्कने केला आहे.
ब्लाइंडसाईट हे कॅमेरा किंवा त्यासारख्या एखाद्या उपकरणांचा वापर करून दृश्य डेटा कॅप्चर करेल. या डेटावर संगणकाद्वारे प्रक्रिया केली जाईल, आणि मेंदूला समजेल अशा स्वरुपात – म्हणजेच इलेक्ट्रिकल इम्पल्समध्ये त्याचे रुपांतर केले जाईल. यानंतर हे इम्पल्स मेंदूमध्ये बसवण्यात आलेल्या न्यूरालिंक चिपकडे पाठवले जातील. यांच्या मदतीने हे डिव्हाईस व्हिजुअल कोर्टेक्समध्ये स्टिम्युलेशन पॅटर्न तयार करतील.
जन्मापासून अंध असणा-या, अपघातामुळे दृष्टी गमावलेल्या अशा सर्वच व्यक्तींसाठी हा एक उत्तम पर्यायी मार्ग ठरू शकतो. डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी साधारणपणे ऑप्टिक नर्व्हचा वापर होतो. न्यूरालिकचे डिव्हाईस हे या नर्व्ह्जना पर्याय म्हणून काम करेल. यामुळे ऑप्टिक नर्व्हज डॅमेज झाल्या असतील, तरीही एखादी व्यक्ती पाहू शकणार आहे. यामध्ये मेंदूला स्टिम्युलेट करणे हेच सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
न्यूरालिंकची यशस्वी वाटचाल -
काही महिन्यांपूर्वी जेव्हा न्यूरालिंकला मानवी चाचणीची परवानगी मिळाली होती, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या कंपनीकडे लागून होते. कोणत्याही कारणामुळे संपूर्ण शरीर अधू पडलेल्या व्यक्तींना केवळ विचार करून कम्प्युटर चालवता येईल, असे भाकित मस्कने तेव्हा केले होते. यानंतर आता असा एक रुग्ण चक्क ‘चेस’ खेळताना दिसला आहे. यामुळे न्यूरालिंक हे मोठ्या वेगाने प्रगती करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
No comments:
Post a Comment