उष्माघात बाधितांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोल्ड रूम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2024

उष्माघात बाधितांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोल्ड रूम

 

मुंबई - उन्हाळी ऋतू तसेच तापमानाच्या वाढत्या पाऱयामुळे उष्माघातासारखे (Heat Stroke) प्रकार होऊ नये यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांत उष्माघात बाधित रूग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १४ रूग्णालयात उष्माघात बाधित रूग्णांसाठी शीत कक्ष (कोल्ड रूम) (cold room) रूग्णशय्या आणि औषधे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. सद्यस्थितीला मुंबई महानगरातील १०३ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्येही वातानुकूलन (एअर कंडिशनर) व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सुचनांबाबत रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. उष्माघाताचा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी सदर उपाययोजना व मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.(Cold rooms in municipal hospitals for heatstroke victims)

येत्या काळात संभाव्य उष्णतेची लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईतील प्रमुख तसेच सर्वसाधारण आणि वैद्यकीय रूग्णालयात मार्गदर्शन व उपचाराची सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत. उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान तुलनेने अधिक असते. त्यामुळे नागरिकांना विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि घराबाहेर काम करणाऱया नागरिकांना उष्माघात (Heat Stroke) होण्याची शक्यता असते. उष्माघात झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करत विविध माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

थंड हवेची खोली (कोल्ड रूम) आणि रूग्णशय्याची व्यवस्था -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात उष्माघात बाधित व्यक्ती आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महानगरपालिकेच्या १४ रुग्णालयात उष्माघात रुग्णाकरीता थंड हवेची व्यवस्था, शीत कक्ष (cold room) असलेली दोन रूग्णशय्यांची व्यवस्था तसेच आवश्यक औषधांची उपलब्धता करण्यात आलेली आहे. उर्वरित रुग्णालयात वातानुकूलन एअर कंडिशनर (Air Conditioner) / कूलरची व्यवस्था करण्यात येत आहे.

अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण -
महानगरपालिकेच्या १०३ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात वातानुकूलन (Air Conditioner) ची व्यवस्था उपलब्ध आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आणि दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचा-यांना उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. उष्माघातावरच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन, उपचार आणि घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये प्राथमिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उष्माघाताचा धोका कमी करण्यासाठी घ्यावयाची काळजी -
उष्माघात संबंधित आजाराची लक्षणे -
* प्रौढांमध्ये
शरीराचे तापमान १०४ फॅरनहाईटपर्यंत (४० डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात.

* लहान मुलांमध्ये
आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ‘हे करा’ -
- डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
- दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात रहावे, बाहेरील कामे सकाळी १० वाजेच्या आत अथवा सायंकाळी ४ नंतर करावीत.
- पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. थेट येणारा सूर्यप्रकाश / उन्हाला टाळावे.
- पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.

‘हे करू नका’
- उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत.
- दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर शक्यतो जाऊ नये
- उन्हात चप्पल न घालता / अनवाणी चालू नये,
- लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना आत ठेवून वाहन बंद करू नये
- चहा, कॉफी इत्यादी गरम पेय टाळावीत.
- भर दुपारी गॅस किंवा स्टोव्ह समोर स्वयंपाक करणे टाळा.

उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास करावयाचे प्रथमोपचार -
• पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून रुग्णाला आडवे झोपण्यास सांगावे.
• त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात/सावलीत आणावे.
• मूल जागे असल्यास वारंवार थंड पाण्याचे घोट पाजावे.
• हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा.
• थंड पाण्याच्या पट्टयांचा वापर करावा.
• कपडे घट्ट असल्यास सैल करावेत.
• उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे.
• उष्माघातासारखे वाटल्यास महानगरपालिकेच्या अथवा जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा कौटुंबिक वैद्यकीय तज्ज्ञांचा (फॅमिली डॉक्टर) सल्ला घ्यावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad