मुंबईत १२ हजार ४६७ वृक्षांची छाटणी पूर्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2024

मुंबईत १२ हजार ४६७ वृक्षांची छाटणी पूर्ण


मुंबई - पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळापूर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर द‍िला आहे. पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्‍हणून मोठ्या झाडांच्‍या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्‍या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे उद्यान विभागाकडून सुरू आहेत. यंदा मुंबई महानगरात एकूण एक लाख ११ हजार ६७० झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट आहे, पैकी १२ हजार ४६७ झाडांची छाटणी झाली आहे. ७ जून २०२४ अखेरपर्यंत उर्वरित ९९ हजार २०३ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या खात्यांमार्फत पावसाळापूर्व कामे करण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी ही सर्व पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व संबंधित खात्यांना दिले आहेत. याच अनुषंगाने उद्यान खात्याकडून करण्यात येणारी कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अम‍ित सैनी यांनी दिले आहेत. त्यानुसार उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या देखरेखीखाली उद्यान विभागाने पावसाळापूर्व कामांना वेग दिला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारामध्ये आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ एवढी झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण वृक्षांपैकी १ लाख ८५ हजार ९६४ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करुन छाटणीची कामे निश्चित करण्यात येतात. जी झाडे लहान असतात, ज्यांच्यापासून कोणताच धोका नसतो, अशांचा सर्वेक्षणात विचार केला जात नाही. या प्रक्रियेनुसार, उद्यान विभागाने यंदा मुंबईतील आकाराने मोठ्या अशा सुमारे १ लाख ८६ हजार २४६ वृक्षांचे सर्वेक्षण केले. त्यात, रस्‍त्‍यांच्‍या कडेला सुमारे १ लाख ११ हजार ६७० झाडे आहेत. ५ एप्रिल २०२४ पर्यंत १२ हजार ४६७ झाडांच्या फांद्या छाटणी करण्‍यात आली आहे. तर ७ जून २०२४ अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्‍या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये या कामी यंत्रसामुग्री, मनुष्‍यबळ उपलब्‍ध आहे. त्याचप्रमाणे, खासगी गृहनिर्माण संस्थांनी महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची सुयोग्य छाटणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

उद्यान विभागाकडून करण्यात येणाऱ्या पावसाळापूर्व कामांमध्‍ये प्रामुख्याने मृत तसेच धोकादायक असलेल्या झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांचे निर्मूलन, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांच्या ढोली व पोकळ्या भरण, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे / खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदींचा समावेश आहे. 'महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५' नुसार महानगरपालिका क्षेत्रातील झाडांची सुयोग्‍यपणे छाटणी केली जाते.

१ हजार ८५५ जणांना नोटीस -
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा महानगरपालिकेद्वारे नियमितपणे घेण्यात येत असते. तथापि, गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय - निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या वृक्षांच्‍या छाटणीकामी, संतुलित करणेकामी महानगरपालिकेने १ हजार ८५५ नोटीस दिल्‍या आहेत.

पावसाळ्याच्या काळात नैसर्गिक कारणांनी झाडे उन्मळून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अतिशय वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad