केईएम रूग्‍णालयात ११ वर्षीय मुलावर यकृत प्रत्यारोपण शस्‍त्रक्रिया यशस्‍वी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2024

केईएम रूग्‍णालयात ११ वर्षीय मुलावर यकृत प्रत्यारोपण शस्‍त्रक्रिया यशस्‍वी


मुंबई - निकामी झालेले यकृत ... मूत्रपिंड कार्यरत नसल्‍याने सुरू असलेले डायलिसिस उपचार ... त्‍यातच हृदयविकार ... यामुळे जगण्‍याची उमेद गमाविलेल्‍या ११ वर्षीय मुलाला बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या राजे एडवर्ड स्‍मारक (केईएम) (KEM Hospital) रूग्‍णालयामुळे  जीवनदान मिळाले आहे. राजे एडवर्ड स्‍मारक रूग्‍णालयाच्‍या वैद्यकीय चमुने सर्व अडचणीवर मात करीत या ११ वर्षीय मुलावर यकृत प्रत्यारोपणाची शस्‍त्रक्रिया यशस्‍वी केली आहे. एवढेच नव्‍हे तर, त्‍याच्‍या हृदयात ‘पेसमेकर’ देखील बसविले आहे. प्रकृती स्थिर झाल्‍यामुळे या मुलाला नुकतेच घरी सोडण्‍यात आले आहे. (successful liver transplant at KEM Hospital)

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्‍मारक रूग्‍णालयाच्‍या अधिष्‍ठाता डॉ. संगीता रावत यांच्‍या विशेष प्रयत्‍नांमुळे आमच्या मुलास नवजीवन मिळाल्याची भावना त्याच्या पालकांनी व्‍यक्‍त केली आहे.        

सूरत (गुजरात) येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या ११ वर्षीय मुलास अपस्‍माराचा (फिट) आजार होता. या आजारावर सूरतमध्ये अनेक ठिकाणी उपचार करण्‍यात आले. मात्र, फेब्रुवारी महिन्‍यापासून फिट येण्याचे प्रमाण वाढले. औषधांच्‍या विपरित परिणामांमुळे मुलाचे यकृत निकामी झाल्‍याचे निदान झाले. त्यानंतर सूरतमधील डॉक्‍टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्‍ला दिला. तसेच बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या राजे एडवर्ड स्‍मारक रूग्‍णालयात यकृत प्रत्‍यारोपणाची सुविधा उपलब्‍ध असल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर मुलाच्‍या पालकांनी उपचारासाठी तातडीने राजे एडवर्ड स्‍मारक रूग्‍णालयात धाव घेतली.  

केईएम रुग्णालयात पोटविकारतज्ज्ञ (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट) डॉ. आकाश शुक्‍ला यांनी या मुलाची वैद्यकीय तपासणी केली. औषधांच्‍या विपरित परिणामांमुळे मुलाचे यकृत निकामी झाले होते. त्याच्या हृदयाचे ठोके देखील नियमितपणे सुरू नव्हते. मूत्रपिंड कार्यरत नसल्‍याने डायलिसिस उपचार सुरू होते. अखेरीस, पालकांच्‍या संमतीने सुरूवातीला मुलावर यकृत प्रत्‍यारोपणाची शस्‍त्रक्रिया करण्‍याचा निर्णय डॉ. चेतन कंथारिया यांच्‍या नेतृत्‍वाखालील वैद्यकीय तज्‍ज्ञांनी घेतला. ते म्‍हणाले की, शरीरामध्ये हृदय, मेंदू, फुप्फुसे याबरोबरच यकृत हादेखील एक महत्त्वाचा अवयव असतो. यकृत हा पोटातील सर्वात मोठा अवयव आहे. चयापचयाच्या क्रियेमध्ये यकृत अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका करते. ढोबळ मानाने उजवा अर्धा आणि डावा अर्धा असे यकृताचे दोन विभाग असतात. यकृत पूर्णत: निकामी होते तेव्हा यकृत प्रत्यारोपण हीच एक संजीवनी असते. ज्या रुग्णाचे यकृत पूर्णत: निकामी झाले आहे, त्याचे निकामी यकृत काढून टाकून त्या जागी दुसरे यकृत बसविणे म्हणजे यकृत प्रत्यारोपण होय. यासाठी एखाद्या जिवंत, निरोगी व्यक्तीच्या शरीरातील अंशत: काढलेले किंवा मृत व्यक्तीच्या शरीरातून पूर्णत: काढलेले यकृत वापरले जाते. यकृत प्रत्यारोपण ही एक अतिशय गुंतागुंतीची, किचकट आणि महागडी शस्त्रक्रिया आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या विशेष प्रयत्नांतून, या मुलाची अवयव प्रत्यारोपण समितीकडे ‘सुपर अर्जंट’ गटात नावनोंदणी करण्‍यात आली. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात एका ४२ वर्षीय रुग्णाने अवयवदान केले होते. या व्यक्तीचे यकृत राजे एडवर्ड स्‍मारक रूग्‍णालयाकडे सुपूर्द करण्‍यास अपोलो रूग्‍णालय व्‍यवस्‍थापनाने मान्‍यता दिली. ‘ग्रीन कॉरिडॉर’ ने हे यकृत राजे एडवर्ड स्‍मारक रूग्‍णालयात आणण्‍यात आले. त्यापूर्वी वैद्यकीय चमूने मुलाच्‍या निकामी यकृताची शस्त्रक्रिया केली आणि नव्या यकृताचे प्रत्यारोपण केले. ही शस्त्रक्रिया आठ तास चालली. भूलतज्ज्ञ अमला कुडाळकर, डॉ. प्रेरणा श्रॉफ,  डॉ. चेतन कंथारिया, एचएन रिलायन्स रुग्णालयामधील डॉ. रवी मोहंका यांनी ही शस्त्रक्रिया केली.

यकृत प्रत्यारोपण झाल्यावर १० दिवसानंतर हृदयरोगतज्‍ज्ञ डॉ. अजय महाजन यांच्‍या नेतृत्‍वाखालील पथकाने या मुलावर पेस मेकर बसवण्याची शस्त्रक्रिया केली. सर्व विभागांच्या समन्वय आणि अनुभवाने हे प्रत्यारोपण यशस्वी झाले. राजे एडवर्ड स्‍मारक रुग्णालयाच्या अधिष्‍ठाता डॉ. संगीता रावत म्‍हणाल्‍या की, अवघ्या ११ वर्षीय मुलावर यकृत प्रत्‍यारोपण करणे अत्यंत आव्हानात्मक होते. अल्‍पवयीन मुलामध्ये यकृत प्रत्यारोपण करणे जोखमीचे होते; परंतु ते आव्हान पेलून डॉक्टरांनी त्‍याला जीवनदान दिले. वैद्यकीय पथकाने यकृत प्रत्यारोपण, पेसमेकर बसविण्‍याची लागोपाठ शस्‍त्रक्रिया यशस्‍वी केली, ही आनंदाची आणि वैद्यकीयदृष्ट्या अभिमानाची बाब आहे. या मुलाला नुकतेच घरी सोडण्‍यात आल्‍याचेही डॉ. रावत यांनी नमूद केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad