28 हजार मोबाईल ब्लॉक करण्याचे दूरसंचार विभागाचे आदेश


दिल्ली - सायबर गुन्ह्यांमध्ये आणि आर्थिक फसवणुकीत टेलिकॉम रिसोर्सेसचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी दूरसंचार विभाग, गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांनी एकत्र मोहीम सुरू केली आहे. या अनुषंगाने दूरसंचार विभागाने देशातल्या विविध टेलिकॉम सर्व्हिस ऑपरेटर्सना 28 हजार 200 मोबाइल हँडसेट्स ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाह देशातल्या 20 लाख मोबाइल कनेक्शनचं रीव्हेरिफिकेशन करण्यास सांगितलं आहे. फसवणूक करणार्‍यांचं नेटवर्क नष्ट करणं आणि नागरिकांना डिजिटल धोक्यांपासून संरक्षण देणं, हा या एकत्रित प्रयत्नाचा उद्देश आहे, असं दूरसंचार विभागाने एका निवेदनात म्हटलं आहे.

गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांनी केलेल्या विश्लेषणात असं निदर्शनास आलं, की विविध सायबर गुन्ह्यांमध्ये 28 हजार 200 मोबाइल हँडसेट्सचा गैरवापर झाला आहे. तसंच या मोबाइल हँडसेट्ससह 20 लाख फोन नंबर्सचा वापर झाला आहे. या मोबाईलचे कनेक्शनचं रीव्हेरिफकेशन झालं नाही तर तेही डिस्कनेक्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला दूरसंचार विभागाने एक मोबाइल नंबर डिस्कनेक्ट केला आणि लिंक केलेली किमान 20 मोबाइल डिव्हाइसेस ब्लॉक केली. याबाबत एका युझरने सरकारी चक्षू वेब पोर्टलच्या माध्यमातून सायबर फसवणुकीची तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चक्षू ही एक ऑनलाइन सेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून नागरिक ऑनलाइन फसवणुकीची तक्रार करू शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाइल फोनच्या वापरसोबतच त्याचा गैरवापरही वाढला आहे. दूरसंचार विभाग यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेळोवेळी विविध निर्णय घेतले जातात. दूरसंचार विभागाने 28 मार्च रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे, की एसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा) आधारित कॉल फॉरवर्डिंग सुविधेचा काही अयोग्य कारणांसाठी गैरवापर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे, 15 एप्रिल 2024 पासून पुढची सूचना मिळेपर्यंत सर्व यूएसएसडी आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments