गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये कचरा टाकू नका, महापालिकेचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2024

गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये कचरा टाकू नका, महापालिकेचे आवाहन



मुंबई - मुंबईतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेल्या तरंगणा-या कच-यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. हा तरंगणारा कचरा नियमितपणे काढला जात असून मुंबईकर नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचरा कुंडीत टाकावा. जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत आणि पाण्याचा जलद निचरा होत राहील, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (Mumbai News)(Marathi News)

मुंबईकर नागरिकांची पावसाळयात कोणत्याही स्‍वरूपाची गैरसोय होणार नाही, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाळापूर्व कामांचा भाग म्‍हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्‍यांमधील गाळ काढण्‍यात येत आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची पाहणी व तपासणी प्रत्‍यक्ष भेट देऊन करत आहेत. तसेच, नालेसफाईची कामे योग्‍य पद्धतीने करण्‍याचे निर्देश देत आहेत.

मोठ्या व छोट्या नाल्‍यांमधील गाळ काढण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. तथापि, काही नाल्‍यांमधील गाळ काढण्‍याचे काम पूर्ण झाले असले तरी भरतीसोबत तरंगता कचरा जमा झाल्‍यामुळे नालेसफाई वारंवार करावी लागत आहे. नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामात निष्‍काळजीपणा, त्रुटी निदर्शनास आल्‍यावर निष्‍काळजीपणा करणा-या कंत्राटदारांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली असून वेगवेगळ्या कंत्राटदारांना मिळून एकूण ५४ लाख ६८ हजार रूपयांची दंड आकारणी करण्‍यात आली आहे.

मुंबईकर नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग अव्याहतपणे काम करत आहे. नाल्यातून गाळ उपसा आणि कचरा बाहेर काढण्याचे काम नियमितपणे आणि वारंवार सुरू आहे. नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. नाल्यांमध्ये येणा-या कच-यास प्रतिरोध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन छोट्या नाल्यांच्या ठिकाणी जाळ्या लावता येतील का अथवा ते नाले बंदिस्त करता येतील का, तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का, याबाबतची चाचपणी करत आहे. प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी जाळी बसविण्यात आली आहे.

नालेसफाईच्‍या माध्‍यमातून दोन प्रकारची कार्यवाही केली जाते. त्‍यात नाल्‍यातून गाळ काढणे आणि नाल्‍यातील पाण्‍यावर तरंगणारा घनकचरा काढणे या प्रमुख दोन कार्यवाहींचा समावेश आहे.नाल्‍यातून गाळ काढण्‍याची कार्यवाही जवळपास पूर्णत्‍वास पोहोचली आहे. मात्र, सफाई झालेल्‍या नाल्‍यातील पाण्‍यावर घनकचरा साचलेला आढळून येत आहे. मुंबईतील नाल्यांमध्ये नागरिकांकडून वारंवार तरंगता कचरा टाकण्यात येत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. या कच-यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॕपर्स असा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तुंचा (फ्लोटिंग मटेरिअल) समावेश आहे. प्लास्टिकवर बंदी असली तरी नागरिक प्लास्टिक कचरा नाल्यात टाकत असल्याने सांडपाणी वहन, निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात. विशेषत: भरतीच्या काळात नाल्यातून तरंगणारा कचरा आणि गाळ काढण्याच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत असतात.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत समन्वय साधून हा तरंगता कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखता येईल, या दृष्टीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल अशा विविध वस्तू व तत्‍सम कचरा नाल्यांमध्ये किंवा गटारांमध्ये टाकू नये , जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत आणि पाण्याचा जलद निचरा होत राहील. नाल्याच्या नजीकच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी, नागरिकांनी नाल्यात थेट कोणताही कचरा न टाकता बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे. कचरा केवळ कचरा कुंडीतच टाकावा. सर्वांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad