मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ६ जागांसह राज्यात १३ लोकसभा मतदारसंघांत २० मे रोजी मतदान होत आहे. यात मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांतील मतदान संख्येची आकडेवारी पाहता उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या सर्वाधिक १८.१२ लाख इतकी आहे तर मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे १४.७४ लाख मतदार आहेत. या मतदारांचा अधिकाधिक कौल कुणाला मिळतो, यावर मुंबईचे गणित अवलंबून असणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने चांगलाच जोर लावला आहे.
उत्तर मुंबईत एकूण १८ लाख ११ हजार ९४२ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९ लाख ६८ हजार ९८३ आहे, तर महिला मतदारांची संख्या ८ लाख ४२ हजार ५४६ एवढी आहे. उत्तर-पश्चिम मुंबईत १७ लाख ३५ हजार ८८ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ३८ हजार ३६५, तर महिला मतदार ७ लाख ९६ हजार ६६३ एवढ्या आहेत. उत्तर-पूर्व मुंबईत १६ लाख ३६ हजार ८९० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख ७७ हजार ८५५ एवढी आहे, तर महिला मतदार ७ लाख ५८ हजार ७९९ एवढ्या आहेत. यासोबतच उत्तर-मध्य मुंबईत १७ लाख ४४ हजार १२८ एवढी एकूण मतदारसंख्या आहे. यामध्ये ९ लाख ४१ हजार २८८ पुरुष मतदार तर ८ लाख २ हजार ७७५ महिला मतदार आहेत.
दक्षिण-मध्य मुंबईत १४ लाख ७४ हजार ४०५ मतदार आहेत. यामध्ये ७ लाख ८७ हजार ६६७ पुरुष मतदार आणि ६ लाख ८६ हजार ५१६ महिला मतदार आहेत. दक्षिण मुंबईत एकूण १५ लाख ३६ हजार १६८ मतदार आहेत. यामध्ये ८ लाख ३२ हजार ५६० पुरुष, तर ७ लाख ३ हजार ५६५ महिला मतदार आहेत. या सर्व मतदारांवरच मुंबईतल्या ६ जागांची मदार आहे.
शेवटच्या टप्प्यात राज्यात १३ मतदारसंघांत निवडणूक होत आहे. यापैकी ६ जागा मुंबईच्या आहेत. मुंबईत भाजप कोणत्याही परिस्थितीत आपला कब्जा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी लिटमस टेस्ट आहे. त्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात जोर लावला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन तोडीस तोड प्रचारयंत्रणा राबवून आपली शक्ती दाखवून दिली. त्यामुळे मुंबईत सर्वच जागांवर चुरस पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment