Mumbai News - मुंबईतील स्मशानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2024

Mumbai News - मुंबईतील स्मशानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणामुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व विभागांमध्ये स्मशानभूमीच्या अंत्यविधीची सुविधा देण्यात येते. स्मशानभूमीच्या ठिकाणी मृतदेहाच्या दहनासाठी पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणे (Eco – Friendly Pyre creation system technology) चा वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व – पश्चिम उपनगरात ९ ठिकाणी हे तंत्रज्ञान बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळतानाच वायु प्रदूषण टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर उपयुक्त ठरणार आहे. (Mumbai News)

वायू प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठीचे पाऊल म्हणून पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर संपूर्ण मुंबई महानगरामध्ये करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉक्टर अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात असे मिळून नऊ ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. विद्युत दाहिनी आणि गॅसदाहिनीच्या सोबतच आता पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर हा प्रदुषण कमी करण्यासाठीच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

मुंबई शहरात भोईवाडा स्मशानभूमी, गोवारी स्मशानभूमी (वडाळा), वैंकुठधाम स्मशानभूमी (रे रोड) तसेच पूर्व उपनगरामध्ये टागोर नगर स्मशानभूमी (विक्रोळी), देवनार कॉलनी स्मशानभूमी (गोवंडी), अमरधाम पोस्टल कॉलनी (चेंबूर) आणि पश्चिम उपनगरामध्ये बाभाई स्मशानभूमी (बोरिवली), ओशिवरा स्मशानभूमी, शिवधाम स्मशानभूमी (गोरेगाव) आदी नऊ ठिकाणी स्मशानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

सध्या मुंबईतील विविध स्मशानभूमीच्या ठिकाणी लाकडी चिता, विद्युत दाहिनी आणि गॅस शवदाहिनीचा वापर मृतदेहाच्या दहनासाठी करण्यात येतो. सद्यस्थितीत १० स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनी आणि १८ स्मशानभूमीच्या ठिकाणी गॅस शवदाहिनी बसविली आहे. आता ९ लाकडी दाहिनीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. याआधी २०२० साली शीव येथील स्मशानभूमीत लाकडी दहन यंत्रणेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यानंतर नऊ ठिकाणी ही पद्धती अंमलात आणण्यासाठीची निविदा प्रक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागामार्फत सुरू आहे.

मृतदेहाच्या दहनासाठी लाकडाएवजी पर्यायी इंधन म्हणून ब्रिकेट्स / पॅलेट्स बायोमासचा वापर करण्यासाठी १४ स्मशानभूमी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱहास टाळतानाच वायु प्रदुषण टाळण्यासाठीही मदत होत आहे.

पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा - 
मृतदेहाच्या दहनासाठी कम्बशन चेंबरचा वापर करण्यात येतो. तसेच दाहिनीच्या भट्टीच्या विशिष्ट रचने मुळे कमीत कमी लाकडांचा वापर हा दहनाच्या प्रक्रियेत होतो. परिणामी प्रदुषणात घट करण्यासाठी मदत होते. प्रत्येत मृतदेहाच्या दहनासाठी लागणाऱ्या ३५० किलो ते ४०० किलो लाकडांच्या तुलनेत १०० ते १२५ किलो इतक्या लाकडाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे सरासरी २५० किलो इतक्या लाकडाची बचत प्रत्येक दहनाच्या प्रक्रियेत होणार आहे. परिणामी कार्बन उर्त्सजनाचे प्रमाणही कमी होण्यासाठी यंत्रणा उपयुक्त आहे. पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशी अद्ययावत स्वरूपाची लाकडी दहन यंत्रणा जरी तयार करण्यात आलेली असली, तरीही धार्मिक विधींसाठीचा विचारही या संरचनेत करण्यात आला आहे. ट्रॉलीच्या बाहेरील बाजुच्या सुविधेमुळे अतिशय सोप्या पद्धतीने धार्मिक विधी करणे शक्य आहे.

ऊर्जा वहनासाठी तसेच कमीत कमी धूर पर्यावरणात चिमणीतून जाईल अशा पद्धतीची रचना दहन यंत्रणेसाठी करण्यात आली आहे. विशिष्ट व्यवस्थेमुळे कमीत कमी धूर निर्माण होतो. वॉटर स्क्रबर आणि सायक्लोनिक सेपरेटरमध्ये वायू प्रदूषकांमधील कण व विषारी वायू काढून टाकले जातात. या प्रक्रियेनंतर निर्माण झालेली हवा ३० मीटर उंच चिमणी मधून हवेत सोडली जाते. मुंबईतील ९ ठिकाणी या यंत्रणेच्या अंमलबजावणीनंतर सध्याचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad