रस्ते अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा - नीलम गोऱ्हे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2024

रस्ते अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा - नीलम गोऱ्हेमुंबई - राज्यात विशेषतः मोठ्या महानगरांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवनात आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे ड्रंक आणि ड्राईव्ह रस्ता सुरक्षा याबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, रस्ते अपघाताची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी पोलिस विभाग आणि परिवहन विभाग यांनी सायंकाळी सहा ते ते रात्री बारा वाजेपर्यंत संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी. त्याचे सूक्ष्म नियोजन करतानाच मद्यपाशन करून वाहन चालविणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. विशेषत: मोठमोठ्या शहरालगतच्या ग्रामीण भागात अवैध दारू दुकान, अवैध धाबे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अल्पवयीन वाहन चालकांवरही नियमाप्रमाणे कारवाई करावी.

पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी.तसेच वाहतूक नियमांची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सूचना फलक लावणे आवश्यक आहे. ठिकठिकाणाच्या सिग्नल यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करावी. ग्रामीण भागात नागरिकांच्या सोयीसाठी सिग्नल यंत्रणेचे सुलभीकरण करावे. ग्रामीण भागात एसटी बसस्थानकाच्या ठिकाणी सूचना फलक आणि सिग्नल यंत्रणा उभारण्याची कार्यवाही करावी.

नागरिकांनी रस्ते अपघाताबाबत ९८३३४९८३३४,९५०३२१११००,९५०३५१११०० या महामार्ग सुरक्षा हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.

परिवहन आयुक्त भीमनवार यांनी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.तसेच यावेळी बोलताना जास्तीत जास्त अपघात हे संध्याकाळी ६ ते ९ आणि ९ ते १२ च्या सुमारास होत असून, आपण अपघात झालेल्या ठिकाणांचे ब्लॅक स्पॉट शोधत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना रवींद्रकुमार सिंगल (पोलीस आयुक्त, नागपूर) यांनी सांगितले की, ११२ आणि १०८ हेल्पलाईन संदर्भात जागृती मोहीम करण गरजेचे असल्याचे सांगितले. तर, प्रवीण पवार (पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर) यांनी बोलताना संभाजीनगर मधील अपघातच प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झाले असल्याचे सांगितले. ब्लॅक स्पॉट संदर्भात पाहणी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी बैठकीत बोलताना अधिकारी मनोज पाटील (अतिरिक्त आयुक्त, पुणे) यांनी आतापर्यंत ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणातील १६८२ लोकांवर कारवाई केल्याचे सांगितले. तसेच पुढच्या तीन महिन्यांत ब्लॅक स्पॉट शोधून अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad