मुंबई - आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांना 26 जून रोजी अभिवादन करत ओबीसी दाखले मुख्यमंत्र्यांकडे परत करून 'आरक्षण छोडो, समाज जोडो' अभियानाची सुरुवात करणार असल्याची माहिती ओबीसी मेडिकोज असोसिएशनचे डॉ. राहुल घुले यांनी दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. राहुल घुले बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत ओबीसी मेडिकोज असोसिएशनचे सहकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना, मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन आणि लक्ष्मण हाके यांचे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन या दोन्ही आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसी समाजात वैर निर्माण होत आहे. ते वाढले तर राज्यात जाती जातीत दंगली होतील. बीड मध्ये झालेले नेत्यांच्या घरावरील हल्ले आणि जाळपोळीच्या घटना इतर जिल्ह्यात घडण्याची शक्यता आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे असे घुले म्हणाले.
आरक्षण गरीब माणसाला, त्यांच्या मुलाबाळांना मिळायला हवे. म्हणून समाजातल्या एकदा आरक्षण घेतलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या लोकांनी आता स्वतःहून आरक्षण सोडायला हवे. प्रत्येक जातीतील गरिबांना, त्यांच्या मुलाबाळांना आरक्षण मिळायला हवे. मी ओबीसी आरक्षण घेतले. डॉक्टर झालो. आता चांगल्या आर्थिक स्थितीत आहे. माझे सहकारी त्याच भूमिकेत आहेत. आम्ही सर्व आरक्षण सोडत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आमचे ओबीसी दाखले परत करत आहोत. ही चळवळ आम्ही राज्यव्यापी करत आहोत. सर्व समाजातील श्रीमंत लोकांनी अशी भूमिका घेतली तर गरिबांना आरक्षणाचा लाभ मिळेल आणि जाती जातीतील भांडण थांबेल अशी भावना डॉ. राहुल घुले यांनी व्यक्त केली आहे.
आरक्षण छोडो, समाज जोडो अभियान राज्यभर नेण्यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर , ठाणे याठिकाणी विचारमंथन बैठका घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती असोसियेशनचे उपाध्यक्ष डॉ. अतुल गिरी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment