सिमेंट काँक्रिट रस्ते कामांची 'कोअर टेस्ट' होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2024

सिमेंट काँक्रिट रस्ते कामांची 'कोअर टेस्ट' होणारमुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई महानगरात सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबईतील नागरिकांना चांगल्या प्रकारचे विशेषतः खड्डेमुक्त रस्ते अनुभवता यावेत, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या कामांमध्ये अधिक गुणवत्ता आणण्यासाठी मुंबईत सुरू असलेल्या प्रत्येक रस्त्याच्या कामाची 'कोअर टेस्ट' (सामर्थ्य चाचणी) केली जाणार आहे. मुंबई उपनगरात दोन ठिकाणी काल (दिनांक १ जुलै २०२४) या चाचणीला सुरूवात झाली आहे.

मुंबईत सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे पूर्ण झालेल्या तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या प्रत्येक सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामांची सामर्थ्य चाचणी करण्याचा निर्णय बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही चाचणी केली जात आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्व मध्ये मांजरेकरवाडी मार्ग आणि विलेपार्ले येथे दीक्षित मार्ग येथे काल (दिनांक १ जुलै २०२४) रस्ते विभागाकडून सामर्थ्य चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर हे स्वतः उपस्थित होते. चाचणी करताना संयंत्राचा वापर करून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचा वर्तुळाकार पद्धतीने भाग कापण्यात आला. हा भाग नमुना म्हणून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हे नमुने पुढील सामर्थ्य तपासणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

मुंबई महानगरात पहिल्या टप्प्याअंतर्गत एकूण ३२४ किलोमीटरच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी २९.३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर दुसऱया टप्प्याअंतर्गत नियोजित सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया सध्या प्रगतिपथावर आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, तसेच तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने कामे व्हावीत, असे उद्दिष्ट बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. प्रकल्प अंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी 'आयआयटी' मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांना विचारमंथन कार्यशाळेतून मार्गदर्शनही केले होते. रस्ते कामांमध्ये गुणवत्ता हमी (Quality Assurance) आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी (Quality Control) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्व मध्ये मांजरेकरवाडी मार्ग आणि विलेपार्ले येथे दीक्षित मार्ग येथे काल (दिनांक १ जुलै २०२४) रस्ते विभागाकडून सामर्थ्य चाचणी करण्यात आली.

आयआयटी मुंबई आणि शासकीय प्रयोगशाळेत नमुने तपासणी होणार -
पश्चिम उपनगरांमध्ये काल (दिनांक १ जुलै २०२४) 'कोअर टेस्ट'मध्ये संकलित केलेले सिमेंट काँक्रिटचे नमुने हे पुढील सामर्थ्य चाचणीसाठी आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबईत सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पातील कामांच्या ठिकाणी सामर्थ्य चाचणी केल्यानंतर संकलित होणारे नमुने हे आयआयटी मुंबई तसेच शासकीय प्रयोगशाळांमध्ये तपासणी करण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. या नमुन्यांची सामर्थ्य तपासणी आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. ‘आयआयटी’मार्फत या नमुन्यांचे परीक्षण व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

सामर्थ्य चाचणी म्हणजे काय ? -
सामर्थ्य चाचणी (कोअर टेस्टिंग मशीन) संयंत्राचा वापर करून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचा भाग वर्तुळाकार पद्धतीने कापण्यात येतो. हा भाग नमुना म्हणून बाहेर काढण्यात येतो. त्यानंतर हा नमुना पुढील तपासणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतो. काँक्रिटच्या भागाची सामर्थ्य चाचणी प्रयोगशाळेत करण्यात येते. काँक्रिट रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या साधनसामुग्रीचे गुणोत्तर, टिकाऊपणा, एकजिनसीपणा, भारवहन याअनुषंगाने विविध परिमाणांच्या निकषांवर सामर्थ्य चाचणी केली जाते. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे सामर्थ्य (strength) तपासणे हे चाचणीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

गुणवत्ता हमी आणि गुणवत्ता नियंत्रण या माध्यमातून सिमेंट काँक्रिटचे रस्ते फक्त अस्तित्वात येणार नाहीत, तर रस्त्यांचा दर्जा सर्वोत्कृष्ट राहील, हे रस्ते विभागाकडून सुनिश्चित करण्यात येत आहे. या गुणवत्ता उद्दिष्टाच्या माध्यमातून कंत्राटदारांवरदेखील अधिकाधिक दर्जेदार कामे करण्याचे बंधन असणार आहे. कमी दर्जाचे काम केलेले चालणार नाही हा संदेशही कंत्राटदारांमध्ये जाईल. तसेच अशा गुणवत्ता चाचण्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad