टोकिओ - जपानच्या शास्त्रज्ञांनी रोबोटिक्सच्या क्षेत्रात एक धाडसी आणि विचार करायला लावणारी यशस्वी चाचणी केली आहे. ही बाब नक्कीच आश्चर्यात टाकणारी आहे. टोकियो विद्यापीठातील प्राध्यापक शोजी ताकेउची यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी रोबोटच्या चेह-यावर जिवंत मानवी त्वचा यशस्वीरीत्या बसविली आहे. एवढेच नाही तर या त्वचेला स्मित हास्य करण्याचीही यंत्रणादेखील बसवण्यात आली आहे.
या भविष्यातील तंत्रज्ञानाची एक झलक देणा-या या संशोधनामुळे शास्त्रीय कल्पना आणि वास्तविकतेमधील सीमारेषा पुन्हा एकदा धुसर झाल्या आहेत. हे यश मानवी त्वचेचा वापर करून अधिकाधिक वास्तववादी रोबोट बनवण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. याचा फायदा केवळ मनोरंजन क्षेत्रातच नाही तर कॉस्मेटिक्स आणि वैद्यकीय क्षेत्रातही होण्याची शक्यता आहे.
संशोधकांच्या टीमने मानवी चेह-याच्या आकाराची जिवंत त्वचा तयार केली आणि नाजूक स्रायुसदृश यंत्रणा वापरून या त्वचेला मोठे स्मित करण्यासाठी प्रेरित केले. प्रा. ताकेउची यांनी स्पष्ट केले की, या कृत्रिम स्रायू आणि आधारांच्या मदतीने आम्ही प्रथमच जिवंत त्वचेची हालचाल करण्यात यशस्वी झालो आहोत.
स्मित हास्य करणा-या रोबोट्सची निर्मिती ही जैविक आणि कृत्रिम यंत्रणा एकत्रित करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनाचा परिणाम आहे. जिवंत त्वचा वापरण्याचे फायदे आहेत. धातू आणि प्लास्टिकच्या तुलनेने जिवंत त्वचा वापरणे ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल तसेच काही बिघाड किंवा नुकसान झाल्यास स्वत:ची दुरुस्ती करण्याची क्षमताही या त्वचेमध्ये असते.
पुढच्या टप्प्यात, संशोधकांचे लक्ष प्रयोगशाळेत तयार केलेल्या या त्वचेमध्ये रक्तप्रवाह आणि स्रायुंचे जाळे निर्माण करण्याकडे आहे. यामुळे त्वचेवर लावण्यात येणा-या सौंदर्य प्रसाधनांची आणि औषधांची अधिक सुरक्षित चाचणी घेणे शक्य होईल. तसेच, रोबोट्सना अधिक वास्तववादी आणि उपयुक्त बनवण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.
No comments:
Post a Comment