बेकरीजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेकरीजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका

Share This

मुंबई - मुंबईतील बहुतांश बेकरी या पदार्थ भाजण्यासाठी भट्टीत खराब झालेली लाकडे वापरतात. त्या लाकडातून बाहेर पडणारी हानिकारक बाष्पशील सेंद्रीय संयुगे (व्हीओसी) ही पीठात शोषली जातात. त्यामुळे बेकरी उत्पादने खाणा-या नागरिकांना कर्करोगाबरोबरच यकृत आणि फुप्फुसाचे आजार होण्याचा धोका वाढत आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात पावाच्या पीठात पोटॅशियम ब्रोमेट किंवा पोटॅशियम आयोडेट या रसायनांचा वापर केला जात असल्याचे नमूद केले. या रासायनिक घटकांमुळे मानवांमध्ये कर्करोग होण्याची आणि थायरॉईडची पातळी बिघडण्याची शक्यता वर्तवली होती. (Cancer risk from bakery products)

सीएसईच्या या अहवालानंतर बॉम्बे एन्व्हायर्नमेंटल अ‍ॅक्शन ग्रुपने (बीईएजी) बेकरी उत्पादनासंदर्भात केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले. त्यात बेकरीतील पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासह यकृत आणि फुप्फुसाचे गंभीर आजार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ‘मुंबईत शाश्वत बेकरी उद्योगाची क्षमता’ या शीर्षकाखाली केलेल्या अभ्यासात संशोधकांनी बेकरीमध्ये वापरल्या जाणा-या टाकाऊ लाकडांच्या ज्वलनातून निघणा-या धुरामुळे कर्करोगासारखा आजार होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

घर-कार्यालयातील खराब झालेले फर्निचर, प्लाय लाकूड हे भंगारात काढल्यानंतर त्याचा वापर हा ब-याचदा विविध बेक-यांमध्ये ज्वलनासाठी केला जातो. या फर्निचरसाठी गोंद, रंग, वाळवी लागू नये यासाठी लावण्यात येणारी रसायने याचा वापर केलेला असतो. अशी लाकडे जाळल्यानंतर त्यातील रसायने ही हवेबरोबर ओव्हनमधील वाफेच्या माध्यमातून आतील बेकरी उत्पादनांत सहज मिसळतात. उत्पादनामध्ये मिसळल्या जाणा-या या रसायनांमुळे नागरिकांना कर्करोग, यकृत आणि फुप्फुसाशी संबंधित आजारांचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे असे बीईएजीचे अभ्यासक डॉ. तुहिन बॅनर्जी यांनी सांगितले 

मुंबईत साधारणपणे ६२८ नोंदणीकृत बेकरींमध्ये बेकरी उत्पादने तयार केली जातात. यापैकी ७२ बेकरींमध्ये उत्पादने बनविण्यासाठी लाकडांचा वापर केला जातो. यामध्ये भंगारामध्ये काढलेल्या फर्निचरचाही मोठ्या प्रमाणात केला जातो. कर्करोग, यकृत व फुफ्फुसाच्या आजाराचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला याची माहिती देण्यात आली असल्याचे डॉ. बॅनर्जी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages