मुंबईत ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2024

मुंबईत ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ


मुंबई - मुंबईत ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ असेल त्यावर आम्हाला आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. जे सत्य आहे ते आहे. जागा किती लढवणार याबाबत काही चर्चाच झाली नाही. जागावाटप झाल्यावर चिठ्ठी तुमच्या हातात देऊ. आजच्या बैठकीत काही राजकीय चर्चा झाली. त्यासोबत बदलापूर आणि इतर भागातील बलात्कार प्रकरणावर चर्चा झाली अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभेत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ होता. जर मुंबईबाबत बोलायचे झाले तर शिवसेना मोठा भाऊच राहिल असे त्यांनी सांगितले. तर सूत्रांच्या हवाल्याने ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईतील ३६ पैकी २०-२२ जागांवर दावा केल्याची माहिती आहे. अणुशक्तीनगरच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. २०१९ च्या निकालात भाजपाने १६ जागा, शिवसेनेने १४ जागा, काँग्रेसने ४, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. २०२४ च्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत सर्वाधिक जागा हव्यात कारण लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे ३, काँग्रेस १, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी १ खासदार निवडून आलेत.

अणुशक्तीनगर मतदारसंघावर मविआच्या तिन्ही पक्षांचा दावा आहे. याठिकाणी विद्यमान राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटात आहेत. शरद पवार गटाचे रवींद्र पवार यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला हवी. तर वांद्रे पूर्व जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. त्याठिकाणी वरूण सरदेसाई हे इच्छुक आहेत. याठिकाणी विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे असून ते पक्षात नाराज आहेत. जर वांद्रे पूर्व जागा आम्हाला सोडली तर चांदिवली विधानसभेची जागा आम्ही काँग्रेसला सोडू असा ठाकरे गटाचा प्रस्ताव आहे. चांदिवली विधानसभेत शिवसेना आमदार दिलीप लांडे आहेत जे शिंदे गटासोबत आहेत. त्याठिकाणी काँग्रेसचे नसीम खान इच्छुक आहेत.

दरम्यान, बदलापूर प्रकरणानंतर जनतेच्या मनात रोष आहे त्यावर चर्चा झाली. हा राजकीय रोष नसून सामाजिक रोष आहे. राजकीय हेतूने आंदोलन नाही. जनता रस्त्यावर उतरत आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे विद्रोहाची आग लागली आहे. बदलापूर प्रकरणी किती जणांवर गुन्हा नोंदवणार आहे? पुढील आठवड्यात अख्खे बदलापूर हे पोलिस स्टेशनला जाणार, तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही लोकांच्या संवेदनाची परीक्षा पाहू नका. माणूस गरीब असू शकतो लाचार नाही. लढवय्या तर कायम असतो. आपल्या इथे मुलींवर बलात्कार होतो. गुन्हा नोंदवला जात नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा घेतला जात नाही हे सगळे असताना महिला घरी शांत बसतील का? आमच्या मुलाबाळांचे काय होणार याची चिंता महाराष्ट्रातील पालकांना पडली आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad