मुंबई - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 29 सप्टेंबरपासून राज्यात बौद्ध समाज संवाद दौरा काढण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी / रेल्वे/ एल आय सी/ विद्वत सभा/ भारिप बहुजन महासंघ जुने पदाधिकारी, कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा/ समता सैनिक दल या सर्वांच्या जिल्हाध्यक्ष तसेच महासचिवांना बौद्ध समाज संवाद दौऱ्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीने पत्रकाच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समाज घटकांशी संवाद साधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार संवाद यात्रा आणि मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याची जबाबदारी पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे राहणार आहे. बौध्द समाज संवाद दौरा २९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्याकरीता काही पदाधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये अशोक सोनोने (भारिप), राजेंद्र पातोडे, अकोला, अमित भुईगळ, औरंगाबाद, यु. जी. बोराळे, नवी मुंबई (बौद्ध महासभा), प्रो. मनोज निकाळजे, मलकापूर (विद्वत सभा) यांचा समावेश आहे.
या संवाद यात्रेत वेगवेगळ्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना सामावून घेतले जाईल. संपूर्ण राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये बैठक होणार आहे. बौध्द समाज संवाद दौऱ्याचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्था तसेच बैठकीचे निमंत्रण व आयोजन पक्षाचे सर्व विंगचे जिल्हाध्यक्ष/ महासचिव यांनी संयुक्तरित्या करावयाचे आहे अशा सूचना वंचित बहुजन आघाडीने दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment