मुंबईकरांनी पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2024

मुंबईकरांनी पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे आवाहन


मुंबई - भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात मागील ३ ते ४ दिवसांमध्‍ये सातत्‍याने पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे दिनांक २१ ऑक्‍टोबर २०२४ पासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गढूळता कमी करण्यासाठी महानगरपालिका जल अभियंता विभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. तथापि, खबरदारीचा उपाय म्‍हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्‍यावे, अशी विनंती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना सात जलस्त्रोतांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या जलस्त्रोतापैकी भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात गत ३ ते ४ दिवसांत जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी, नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याची गढूळता दिनांक २१ ऑक्‍टोबर २०२४ पासून वाढली आहे, असे निदर्शनास आले आहे.

मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत. पाण्‍यातील गढूळता कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्‍या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरीनचा देखील पुरेसा वापर केला जात आहे.

या बाबी लक्षात घेता, नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. गढूळ पाणी प्राप्‍त झाल्‍यास खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad