मुंबईतील मतमोजणीसाठी चोख नियोजन आणि बंदोबस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2024

मुंबईतील मतमोजणीसाठी चोख नियोजन आणि बंदोबस्त


मुंबई - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ साठी मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्ह्यात मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले असून प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्ह्यातील मिळून एकूण ३६ मतदारसंघांसाठी ३६ केंद्रांवर शनिवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल. प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी सुमारे २ हजार ७०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. (Vote counting in Mumbai)

भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, प्रथमच मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकारीपदाची संयुक्तपणे जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई शहर), संजय यादव, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगरे) राजेंद्र क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण ३६ मतदारसंघांसाठी विधानसभा मतदारसंघांमध्ये दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.  

मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ५२.६५ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण १० मतदारसंघात मिळून एकूण २५ लाख ४३ हजार ६१० मतदार आहेत. यापैकी एकूण १३ लाख ३९ हजार २९९ नागरिकांनी मतदान केले. त्यामध्ये वर्गीकरण लक्षात घेता, १३ लाख ६५ हजार ९०४ पुरुषांपैकी ७ लाख १० हजार १७४ पुरुष मतदारांनी मतदान केले. तर, एकूण ११ लाख ७७ हजार ४६२ महिलांपैकी ६ लाख २९ हजार ०४९ महिलांनी मतदान केले. इतर २४४ मतदारांपैकी ७६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५६.३९ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण २६ मतदारसंघात मिळून एकूण ७६ लाख ८६ हजार ०९८ मतदार आहेत. यापैकी एकूण ४३ लाख ३४ हजार ५१३ नागरिकांनी मतदान केले. त्यामध्ये वर्गीकरण लक्षात घेता, ४१ लाख ०१ हजार ४५७ पुरुषांपैकी २३ लाख ५८९ पुरुष मतदारांनी मतदान केले. तर, एकूण ३५ लाख ८३ हजार ८०३ महिलांपैकी २० लाख ३३ हजार ६५४ महिलांनी मतदान केले. इतर ८३८ मतदारांपैकी २७० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हिव्हीपॅट संयंत्रे संबंधित मतदारसंघांच्या स्ट्राँग रुममध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. एकूण ३६ स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) यांच्यासह राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) तसेच पोलिस तैनात आहेत. हे सर्व स्ट्राँग रुम सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत.   

मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रशासनाने मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यासाठी तयारी केली आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण ३६ मतदारसंघांसाठी ३६ केंद्रांवर शनिवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी, टपाली मतदानांची मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतदानाची गणना केली जाईल.  प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघानुसार, निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, सहायक कर्मचारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षेसाठी पोलिस दलासोबत अन्य यंत्रणांचेही मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील ३६ मतदारसंघांच्या एकूण ३६ मतमोजणी केंद्रांवर मिळून सुमारे २ हजार ७०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे मिळून एकूण १० हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी मतमोजणी केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष मतमोजणी पारदर्शकपणे आणि सुलभरित्या व्हावी, या अनुषंगाने मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोनवेळा प्रशिक्षण देण्यात येत आहे. दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी यासाठी पहिल्यांदाचा प्रशिक्षण देण्यात आले. तर, शुक्रवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad