
मुंबई - राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी पक्षाची मोटबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनातील खदखद व्यक्त केली. एवढे धक्क्यावर धक्के बसले आहेत की मी आता धक्कापुरुष झालोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाची मोट बांधणी सुरु आहे. पुण्यातील ६ माजी नगरसेवक आणि माजी आमदार जेष्ठ शिवसेना नेते राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे वाढत चाललेलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गट आता सक्रीय झाला आहे. यामुळे दर मंगळवारी शिवसेना आणि ठाकरे गटाची बैठक होणार आहे.दर मंगळवारी पक्षाचे १४ प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. लवकरच आमदार आणि खासदारांची देखील स्वतंत्रपणे बैठक होणार आहे. या मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
ठाकरे गटातील नेत्यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझी जपानसारखी परिस्थिती झाली आहे. जपानमध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही की त्यांना आश्चर्य वाटतं. उद्धव ठाकरेंना एवढे धक्क्यावर धक्के बसले आहेत की मी आता धक्कापुरुष झालोय. कोण किती धक्के देतंय ते पाहूयात. आपण असा धक्का देऊया पुन्हा हे दिसता कामा नये.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “पक्षामध्ये एखादा निर्णय घ्यावा लागतो. एखादा निर्णय घेतल्यावर नाराजी असतेच. पण सैनिक म्हटल्यावर शिस्त आली पाहिजे. लढाई एकट्या दुकट्याची नाही ही लढाई आपली आहे. सगळ्यांनी छावा सिनेमा आवर्जून बघा. जे जे लोक बाहेर येतात ते डोळे पुसत बाहेर येत आहेत. डोळे उघडून सर्वांनी हा पिक्चर बघा.” असा सावधगिरीचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे संकेत देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना दिले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, हे संघटनात्मक बांधणी करण्याचे आत्ताचे दिवस आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा सुप्रीम कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी लागू शकतो. 277 आणि 236 चा निकाल कधीही हाती येईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. मग सर्वांना दिलेले ती काम सर्वांनी करा. शाखेनुसार काम करा. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक होणार नाही” असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment