
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत, ज्या ठिकाणी काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी थर्मोप्लास्ट रेषांकन, परावर्तक रस्ता खुणा (Cat's Eyes), दिशादर्शक फलक (Signages) , वाहतूक सुरक्षा चिन्हे (Road signs),चौकातील जाळीदार चिन्हांकन (Junction Grid) यांसारखी अंतिम कामे तातडीने पूर्ण करून संबंधित रस्त्यांवर वाहतूक सुरू करावी, तसेच परिसर सुशोभीकरणात भर घालावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. पारंपरिक काँक्रिटीकरण समवेत 'अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग' (यूटीडब्ल्यूटी) पद्धतीचा देखील शक्य तिथे अवलंब केला पाहिजे, अशी महत्वपूर्ण सूचना बांगर यांनी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णत्वास जावे, यासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करण्यात आले आहे. प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्याची निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. या अंतर्गत घाटकोपर (पूर्व) येथील श्रीमद् राजचंद्र ज्ञानमंदिर मार्ग, कुर्ला (पूर्व) येथील शिवसृष्टी मार्ग या पूर्णत्वास आलेल्या रस्त्यांची तर घाटकोपर पूर्वमध्ये विद्याभवन मार्ग आणि घाटकोपर (पश्चिम) येथील संघानी इस्टेट मार्ग येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामाची अभिजीत बांगर यांनी काल (दिनांक २९ एप्रिल २०२५) रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले.
घाटकोपर (पूर्व) येथील श्रीमद् राजचंद्र ज्ञानमंदिर मार्गाचे टप्पा १ अंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्त्यावर विस्तारण सांधे (Expansion Joints) डांबराने भरावयाचे काम सुरू होते. याची पाहणी करताना अभिजीत बांगर म्हणाले की, काँक्रिट रस्त्यामध्ये केल्या जाणा-या जॉइंट कटिंगमुळे जे विस्तारण सांधे (Expansion Joints) तयार होतात त्यामध्ये योग्य रसायन भरून त्या सुरक्षित व लवचिक ठेवणे आवश्यक आहे. तापमान बदलामुळे काँक्रिट रस्ते प्रसरण (Expansion) आणि आकुंचन (Contraction) पावतात. त्यामुळे काँक्रिट स्लॅब मध्ये भेगा/ तडे (Crack) पडू नयेत म्हणून दोन स्लॅबमध्ये विस्तारण सांधे ठेवले जातात. रस्ता मजबूत ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकवण्यासाठी हे सांधे अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात. या फटीत डांबर (Bitumen) वापरले जात असले तरी आता अधिक चांगला पर्याय म्हणून 'सिलिकॉन सिलेंट' चा वापर केला पाहिजे. हे द्रव रसायन लवचिक (Flexible) असते आणि ते तापमान व दाब सहन करू शकते.त्यामुळे रस्ते काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर, स्लॅबमधील विस्तारण सांधे योग्य प्रकारे सिलिकॉन सिलेंटने भरावेत जेणेकरून भेगा / तडे पडणार नाहीत.
कुर्ला (पूर्व) येथील शिवसृष्टी मार्गाचे काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. २१० मीटर लांबीच्या आणि १४ मीटर रूंदीच्या या रस्त्यावर सुसज्ज पदपथ, पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी, विविध सेवा / उपयोगिता (युटिलिटी) वाहिन्यांच्या कामांसह थर्मोप्लास्टिक रेषांकन, परावर्तक रस्ता खुणा, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे आदींचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच परिसर सुशोभीकरणात भर पडली आहे. याची पाहणी केल्यानंतर अभिजीत बांगर म्हणाले की, दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानुसार, प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्याची निश्चित तारीख ठरविली आहे. केवळ काँक्रिटीकरण कामापुरते न थांबता थर्मोप्लास्ट, परावर्तक रस्ता खुणा, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जाळीदार चिन्हांकन, सुरक्षा कठडे, गतिरोधक आदींची कामे पूर्ण झाली पाहिजेत. जेणेकरुन रस्त्यांची उपयुक्तता ख-या अर्थाने साध्य होईल, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर पडेल, असेदेखील बांगर यांनी नमूद केले.
घाटकोपर पूर्व येथील विद्याभवन मार्ग काँक्रिटीकरण कार्यस्थळाची पाहणी करताना अभिजीत बांगर यांनी स्थानिक अभियंत्यांशी संवाद साधला. तसेच, विभागातील रस्ते काँक्रिटीकरण कामांची माहिती घेतली. पाहणी दौऱयादरम्यान प्रत्यक्ष कार्यस्थळी स्लम्प चाचणी करण्यात आली. त्याचे परिणाम (रिझल्ट) योग्य असल्याचे आढळून आले.
घाटकोपर (पश्चिम) येथील संघानी इस्टेट मार्गाची थीन व्हाईट टॉपिंग (टीडब्ल्यूटी Thin White Topping) पद्धतीद्वारे बांधणी करण्यात येत आहे. व्हाईट टॉपिंग ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये जुन्या डांबरी रस्त्यावर एक पातळ (थीन) किंवा जाड (थीक) काँक्रिटचा थर घालून रस्त्याचे मजबुतीकरण केले जाते. ज्यामुळे रस्ता अधिक टिकाऊ, मजबूत आणि दीर्घकालीन होतो. पारंपरिक काँक्रिटीकरण करताना एम ४० तर व्हाईट टॉपिंगसाठी एम ६० ग्रेड काँक्रिटचा वापर केला जातो. तसेच, पारंपरिक काँक्रिटीकरण करताना खालील थर नव्याने करणे आवश्यक असते. मात्र, व्हाईट टॉपिंग पद्धतीत जर मूळ डांबराचा थर चांगला असेल तर नव्याने थर करण्याची आवश्यकता भासत नाही. तसेच, पारंपरिक काँक्रिट पद्धतीत १४ दिवसांचा तर व्हाईट टॉपिंग पद्धतीत ७ दिवसांचा 'क्युरिंग' कालावधी लागतो. एकूणच, व्हाईट टॉपिंग पद्धतीत कामे जलद गतीने होतात. तसेच, मूळ काँक्रिटच्या तुलनेत कमी खर्च येतो.याचा विचार करता पारंपरिक काँक्रिटीकरण समवेत अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग (यूटीडब्ल्यूटी) पद्धतीचा देखील शक्य तिथे अवलंब केला पाहिजे, अशी महत्वपूर्ण सूचना बांगर यांनी केली. पारंपरिक काँक्रिटीकरण आणि व्हाईट टॉपिंग पद्धतीने रस्ते बांधणीसाठी लागणारा आवश्यक कालावधी, खर्च यांची तुलना करता अधिकाधिक रस्ते व्हाईट टॉपिंग पद्धतीने विकसित करता येवू शकतील, असे बांगर यांनी नमूद केले.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन देबबर्मा, महानगरपालिकेचे रस्ते व वाहतूक विभागाचे उपप्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) संजय सोनवणे यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा