राज्यात पुरुष हक्क समिती स्थापन करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात पुरुष हक्क समिती स्थापन करण्याची मागणी

Share This

नाशिक - महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यासंदर्भातील गुन्ह्यांची माहिती मिळत असते. परंतु पुरुषांवर काही महिलांकडून अत्याचार होत असतात. त्या अत्याचारास कंटाळून काही पुरुषांनी जीवनही संपवले आहे. त्यामुळे राज्यात पुरुष हक्क समिती स्थापन करण्याची मागणी होत आहे.

आता नाशिकमध्ये एक अनोखा मेळावा पार पडला. नाशिकमध्ये पत्नीपीडित पुरुषांचे संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात पत्नीपीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. आमच्यासाठी कायदा करा, आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी केली. पत्नीपीडीत पुरुषांच्या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष होते. या मेळाव्यात महाराष्ट्रातील अनेक पत्नीपीडीत पुरुष उपस्थित झाले होते.

पुरुषाच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केलेल्या घटना आपण अनेकदा बघतो. मात्र आता पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांची संख्या देखील वाढत चालली आहे. याच पत्नीपीडित पुरुषांना मानसिक आधार देण्याचे काम पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनतर्फे केले जात आहे. त्यांना मानसिक आणि कायदेशीर सल्ला देण्याचे काम देखील मेळाव्यात करण्यात आले. ज्याप्रमाणे महिलांसाठी कठोर कायदे करण्यात आले, त्याचप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदा करण्यात येऊन स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा, अशी मागणी देखील यावेळी पत्नीपीडित पुरुषांनी केली.

मेळाव्यात आलेला एक पुरुष म्हणाला, आमचे लव्हमॅरेज झाले होते. माझी पत्नी चार दिवस राहिली. त्यानंतर ती माहेरी गेली. त्यानंतर त्या मुलीची आई म्हणाली, संपत्ती माझ्या मुलीच्या नावावर कर. मी नकार दिल्यावर माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर माझ्यावर छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मेळाव्यात आलेला आणखी एक पुरुष म्हणाला, लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीकडून मला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. मला ती इंजिनिअर असल्याचे सांगून लग्न करण्यात आले. परंतु माझी फसवणूक झाली. ती इंजिनिअर नव्हती. उलट ती माझ्याकडे पैशांची मागणी करू लागली. १७ लाख दे, नाहीतर मी तुला आयुष्यभर त्रास देईल, अशी धमकी तिने दिली.

तृप्ती देसाई यांची मागणी
राज्यात पुरुषांवर होणा-या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारने महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages