
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले.
चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, डॉ. बाबासाहेबांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि देशभक्त म्हणून गौरविले जाते. बाबासाहेबांनी लोकशाही, सामाजिक समता व लिंग समानतेसाठी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.
राज्यपाल महोदयांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताना संविधानालाच आपले मार्गदर्शक मानले. इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. आंबेडकर स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारताच्या एकतेचा आणि संविधानिक मूल्यांचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचला - मुख्यमंत्री
भारताच्या संविधानाच्या माध्यमातून देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याचे अमूल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. आज आपण जो एकसंघ भारताचा अनुभव घेत आहोत, त्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच आधारस्तंभ आहे. संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. देशातील सामाजिक विषमतेला आव्हान देत समता आणि बंधुत्वाचे मूल्य देशात रुजवण्याचे ऐतिहासिक कार्य बाबासाहेबांनी केले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकार, संधीची समानता आणि आपली स्वप्ने साकार करण्याचा विश्वास दिला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे आजचा आधुनिक भारत घडला असून, त्यांच्या विचारांचे पालन करून संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा ठेवणे हीच त्यांच्या जयंतीला खरी आदरांजली ठरेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारताचे संविधान हे माझ्यासाठी सर्वोच्च आहे. भारताच्या विकासात आणि प्रगतीच्या दिशेने देशाला पुढे नेण्यात संविधानाची भूमिका मोलाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत शिक्षण, सामाजिक न्याय, औद्योगिक विकास आणि मानवी हक्कांचे जसे मोलाचे योगदान आहे, तसेच आधुनिक भारताच्या संरचनेतही त्यांचे कार्य अतुलनीय आहे. पाटबंधारे योजना, राष्ट्रीय विद्युत ग्रीड, कामगार हक्कांचे संरक्षण, तसेच अन्य महत्त्वाच्या धोरणांचे शिल्पकार म्हणून त्यांनी देशाला दीर्घकालीन दिशा दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व विचारांना अभिवादन करणे आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा राखत समता, बंधुता व न्याय यांचा अंगीकार करणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली. राज्यपाल यांच्या हस्ते सर्व भिक्षूंना चिवरदान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी अंध विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी भन्ते डॉ. राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्धवंदना म्हणण्यात आली. तसेच मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. हेलिकॉप्टर मधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
Home
महाराष्ट्र
मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा
Share This
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2012-13. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

No comments:
Post a Comment