बेस्ट बस भाडेवाढ मागे घेण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट बस भाडेवाढ मागे घेण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

Share This


मुंबई - बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. मात्र बेस्टच्या तिकीट दर वाढीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांची राष्ट्रवादी, समाजवादी व जनता दलाने विरोध केला आहे.

इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या. बेस्ट वाचवा, अशी पोस्ट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केली आहे. तर बेस्टच्या तिकीट दरात वाढ ही मुंबईकरांच्या खिशावर डल्ला असून फक्त कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी ही दरवाढ आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी केला आहे.

मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बस सेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या २-३ वर्षांत दुर्लक्ष केले जात आहे. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ म्हणजे सामान्य मुंबईकरांचे रोजचे जगणं कठीण व्हावे असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा अशी ओळख असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचे हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी एक्सवर म्हटले आहे.

बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे. बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावली असून महत्वाचे मार्ग बंद केले आहेत. आता जर दरवाढ केली तर बेस्ट वर त्याचा विपरीत परिणाम होईल. बेस्टला जगवण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या! बेस्ट वाचवा, असे आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

मुंबईची शान आणि सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेली बेस्ट गंडांतराच्या उंबरठ्यावर उभी आहे. पालिकेच्या प्रशासनाने घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे बेस्टच्या भाड्यात थेट दुप्पट वाढ करण्यात आली आहे, आणि तीही केवळ काही मोजक्या कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी, असा आरोप शरद पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.

बेस्ट प्रशासनाने बेस्ट बसच्या किमान भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. याची परिणती बसचे प्रवासी रिक्षा - टॅक्सीकडे वळतील, असा इशारा देतानाच ही भाडेवाढ मागे घेण्याची मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाने केली आहे. मुळात प्रवाशांची घटणारी संख्या रोखण्यासाठी बस भाड्यात कपात करण्यात आली होती. वास्तवात मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता शहरासाठी आठ ते नऊ हजार बसची गरज आहे, असे मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रदेश सचिव संजय परब यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages