मुंबईच्या परिस्थितीला भाजप सरकारची उदासीनता जबाबदार - आदित्य ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2025

मुंबईच्या परिस्थितीला भाजप सरकारची उदासीनता जबाबदार - आदित्य ठाकरे


मुंबई - सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rain) कोसळत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटींग सुरु असल्याने मुंबई ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईच्या परिस्थितीला भाजप (BJP) सरकारची उदासीनता जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजप सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महापालिकेवर नियंत्रण असलेल्या भाजप सरकारच्या पूर्णपणे उदासीन आणि निष्क्रीय भूमिकेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे. “मुंबईतील अशा भागांमध्ये पाणी साचले आहे जिथे याआधी कधीच पाणी साचले नव्हते. 2021-22 मध्ये आपण हिंदमाता परिसर पाणी साचण्यापासून मुक्त केला होता. मात्र, यंदा पुन्हा तिथे पाणी साचले आहे, कारण महापालिकेने योग्य वेळी पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरूच केली नाही,” असे त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका परिसरात पाणी साचल्याचे दिसून आले. आता मात्र अशा अनेक भागांमध्ये हीच स्थिती पाहायला मिळते, जिथे भाजपच्या निष्क्रियतेचा थेट फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे. “मुंबईचा एवढा द्वेष भाजपला का आहे?” असा थेट सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, शहरातील अर्धवट रस्त्यांचे काम आणि नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळेच आज यापूर्वी कधीही पाणी न साचलेल्या ठिकाणी सुद्धा पाणी तुंबत आहे. भाजपच्या उदासीनतेचा मुंबईला मोठा फटका बसला आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

यश, अपयश हा विषय नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे. नळावरच्या भांडणासारखं करू नका. दहा गोष्टी आम्हालाही बोलता येतील.
- गिरीश महाजन (मंत्री) 

ही पोलखोल कशी काय? पाऊस जर 15 दिवस आधी पडला तर काय होणार, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मी कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट पाहिले, आता पाणी राहिलेले नाही. 10 जूननंतर पाऊस येतो तशी तयारी आपण करत असतो. नरिमन पॉइंटला 252 मिमी पाऊस पडला.नागरिकाना त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. मुख्यमंत्री संपर्क ठेऊन आहेत, यंत्रणा अलर्ट आहे. माहिम भागात म्हाडा इमारतीचा काही भाग कोसळला आहे, येथील लोकांना सुरक्षितरित्या दुसरीकडे पाठविण्यात आलं असून आधीच पाऊस पडल्यामुळे थोडी गैरसोय झाली.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS