अतिवृष्टी - नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2025

अतिवृष्टी - नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश



मुंबई - राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठे, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.

यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला.

राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

'सचेत' प्रणालीवरून १९ कोटी मोबाईल लघु संदेशाद्वारे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश देण्यात येत आहेत. त्यावरून १९ कोटी २२ लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे श्रीमती सेठी यांनी सांगितले.

राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयातील जलसाठा अकरा टीएमसीने वाढल्याची माहिती दिली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात टँकरच्या संख्येत काही अंशी घट झाली आहे, तथापि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS