
मुंबई - भारतीय जीवन विमा निगमाने (एलआयसी) एक अभूतपूर्व कामगिरी नोंदवत २४ तासांत ५,८८,१०७ जीवन विमा पॉलिसी विक्रीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. २० जानेवारी २०२५ रोजी देशभरातील ४,५२,८३९ एजंट्सनी एकत्र येऊन ही ऐतिहासिक उपलब्धी साध्य केली. या कामगिरीमुळे एलआयसीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत स्थान मिळाले आहे.
एलआयसीने या यशाचे श्रेय आपल्या एजंट्सच्या समर्पण, मेहनत आणि व्यावसायिक दृष्टिकोनाला दिले आहे. कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे, "आमच्या एजंट्सची मेहनत आणि ग्राहकांचा विश्वास यामुळेच हा रेकॉर्ड शक्य झाला. हा केवळ आकडा नाही, तर देशभरातील लाखो कुटुंबांना दिलेल्या आर्थिक सुरक्षिततेचा पुरावा आहे."
हा रेकॉर्ड 'मॅड मिलियन डे' या विशेष मोहिमेअंतर्गत साध्य झाला. एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी ही मोहीम सुरू केली होती. त्यांनी सर्व एजंट्सना २० जानेवारी रोजी किमान एक जीवन विमा पॉलिसी विकण्याचे आवाहन केले होते. याचा परिणाम म्हणून देशभरात विमा क्षेत्रातील ही सर्वात मोठी कामगिरी नोंदवली गेली.
या रेकॉर्डनंतर सिद्धार्थ मोहंती म्हणाले, "मी प्रत्येक ग्राहक, एजंट आणि एलआयसी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मनापासून आभार मानतो. तुम्ही सर्वांनी या दिवसाला ऐतिहासिक बनवले." एलआयसीचा हा रेकॉर्ड केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून, भारतीय जनता आजही जीवन विम्याचे महत्त्व समजून त्यावर विश्वास ठेवत असल्याचे द्योतक आहे. या यशाने भारतातील विमा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली आहे. एलआयसीच्या या ऐतिहासिक कामगिरीने देशभरातील ग्राहक आणि विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. येत्या काळातही एलआयसी अशा प्रकारे लोकांचा विश्वास जपत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment