
पुणे - वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले आहे. नीलेश चव्हाणला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रकरणात पीडित कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्या प्रकरणी नीलेश चव्हाण या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे. तसेच त्याने त्याच्या पत्नीचा अमानुष छळ व तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. त्याला आता नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. त्याला काल रात्री पुण्यात आणले गेले. त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. आज सकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फोनमधील व्हॉट्सअॅप संदेश आणि चॅट्सचा तपास सुरू...
अटक केल्यानंतर नीलेश चव्हाणला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत. जेणेकरून पोलिसांना तपासासाठी आवश्यक वेळ मिळू शकेल. पोलिसांनी या प्रकरणातील इतर आरोपींच्या मोबाईल फोनमधील व्हॉट्सअॅप संदेश आणि चॅट्सचा तपास सुरू केली आहे. नीलेश चव्हाणच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे, आणि पोलिसांनी उर्वरित आरोपींबाबतही तपास सुरू केला आहे. यात वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या दिवशी नीलेश हा शशांक हगवणेच्या संपर्कात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
अटक आणि तपासाची पार्श्वभूमी...
नीलेश चव्हाण हा वैष्णवीच्या नणंदेचा मित्र असून, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तो 21 मेपासून फरार होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात पथकांची स्थापना करून, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा मागोवा घेतला. अखेर, नेपाळ सीमेवरील महाराजगंज जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली. फरार असताना त्याने मोबाईल आणि एटीएमचा वापर टाळून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता.
नीलेश चव्हाण हा करिष्मा हगवणेचा मित्र...
नीलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेचे पती शशांक हगवणे आणि बहिण करिष्मा हगवणे यांचा मित्र आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा ठपका आहे. तो स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित करायचा. या प्रकरणी त्याच्यावर 2019 मध्ये पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच ठाण्यात नीलेश चव्हाणवर वैष्णवी हगवणेचे बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या माहेरच्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2019 मध्ये नेमके काय घडले होते?..
यासंबंधीच्या माहितीनुसार, नीलेश चव्हाणचे लग्न 3 जून 2018 रोजी झाले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये त्याच्या पत्नीला आपल्या बेडरूममधील सीलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याचा संशय आला. तिने याविषयी नीलेशला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पुढच्या फेब्रुवारी महिन्यात त्याच्या पत्नीला घरातील एसीलाही काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी तिचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर तिने आपल्या पतीला म्हणजे नीलेश चव्हाणला त्याचा जाब विचारला.
त्यावर नीलेशने पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्याच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला असता त्यात त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याने रेकॉर्ड केल्याचे तिला आढळले. एवढेच नव्हे तर नीलेशचे इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओही तिच्या निदर्शनास आले. तिने या प्रकरणी नीलेशकडे विचारणा केली असता त्याने घरातील चाकू दाखवून तिला धमकावले. तिचा गळा दाबला. एवढेच नाही तर तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले.
पोलिसांनी अटक करण्यास केली होती टाळाटाळ..
नीलेशच्या पत्नीने या प्रकाराची माहिती त्याच्या आई-वडिलांना व घरातील इतर सदस्यांना दिली. त्यानंतर त्यांच्याकडूनही तिचा छळ सुरू झाला. त्यानंतर पुढील अनेक महिने नीलेशने पीडित महिलेचा म्हणजे आपल्या पत्नीचा अतोनात छळ केला. त्यामुळे तिने आपले घर सोडण्याचा निर्णय दिला. त्यानंतर 14 जून 2022 रोजी तिच्या तक्रारीनुसार नीलेश व त्याच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळण्यात आल्यानंतरही वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
नीलेश चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याचा पोकलेन मशीनचाही व्यवसाय आहे. नीलेश चव्हाण हा मयत वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे याची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे. शशांक व वैष्णवी यांच्यातील वादात अनेकदा त्याने हस्तक्षेप केल्याचीही माहिती आहे. कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत नीलेशच्या वडिलांचे 3 फ्लॅट आहेत.
No comments:
Post a Comment