मार्च 2026 पूर्वी संपूर्ण देश नक्षलमुक्त करणार - अमित शाह - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2025

मार्च 2026 पूर्वी संपूर्ण देश नक्षलमुक्त करणार - अमित शाह



नांदेड - ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईतून भारताने आपली क्षमता आणि ताकद जगासमोर सिद्ध केली असून भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा मोदी सरकारने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर जगाला दिला आहे. आता देशातील नक्षलवाद्यांचे अड्डेही उद्ध्वस्त करण्यात येत असून 31 मार्च 2026 या तारखेपूर्वी या देशाच्या भूमिवरून नक्षलवादाचा नायनाट झालेला असेल, या संकल्पाचा पुनरुच्चार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी नांदेड येथील प्रचंड शंखनाद सभेत बोलताना केला.

गेल्या 22 एप्रिलला पहलगाममध्ये पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी आपल्या निष्पाप पर्यटकांची भ्याड हत्या केली, तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना धूळ चारण्याचा इशारा दिला होता. 10 वर्षांपूर्वीची काँग्रेसची सत्ता संपली आहे, आता मोदी सरकार आहे, याचा पाकिस्तानला विसार पडला. पहलगाम हल्ल्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानात घुसून शेकडो पाकिस्तानी अतिरेक्यांना ठार करून केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला एक संदेश दिला गेला आहे. भारताच्या जनतेवर, सीमेवर हल्ला झाला तर ‘गोली का जवाब गोले से दिया जायेगा’, हा संदेश देऊन 7 मे रोजी 22 मिनिटांत अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम भारतीय सेनेने केले. 8 मे रोजी पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले केले, पण आपल्या सक्षम सुरक्षा व्यवस्थेने एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन भारताच्या भूमीवर घुसू न देता हवेतच त्यांची वासलात लावली. 9 तारखेला पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम आणि हवाई तळांवर हल्ले करून आमच्या सेनेने त्यांची पूर्णपणे वाताहत केली, आणि आमच्या माताभगिनींच्या कपाळावरचे ‘सिंदूर’ स्वस्त नाही, याची जाणीव जगाला करून दिली. हा नवा भारत असून विकसित आणि बलवान भारताकडे कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतही होणार नाही, हे मोदी सरकारने सिद्ध करून दाखविले. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, व्यापार आणि दहशतवादही एकत्र चालणार नाही, हे मोदी यांनी बजावले आहे. यापुढे अशी आगळीक केलीच तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही मोदी यांनी दिला आहे. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी सर्वपक्षीय नेते जगाच्या वेगवेगळ्या देशांत जात असताना, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या एका नेत्याने गळे काढण्यास सुरुवात केली, पण जर बाळासाहेब असते, तर ऑपरेशन सिंदूर च्या यशस्वी कारवाईबद्दल त्यांनी मोदीजींना मिठी मारली असती, अशा शब्दांत शाह यांनी ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा नामोल्लेखही न करता टीका केली. या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळात त्यांच्या पक्षाचेही प्रतिनिधी आहेत, पण उद्धव सेना त्याची वरात म्हणून संभावना करते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपल्या भाषणात शाह यांनी फडणवीस सरकारने मराठवाड्यात सुरू केलेल्या पाणी योजनांचा संपूर्ण तपशील मांडला. ठाकरे सरकारने त्यामध्ये अडथळे आणले, पण आता पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकारने या सर्व प्रकल्पांना गती दिली असून मराठवाड्याच्या प्रत्येक घरात, शेतात पाणी पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची जुनी मागणी असतानाही शरद पवार यांच्यासारख्या दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या नेत्याने काहीच केले नाही, ते काम मोदीजींनी केले, असे ते म्हणाले. येत्या काही वर्षांत शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि सावरकरांची ही महाराष्ट्र भूमी विकसित भारताच्या निर्मितीत अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री व खा. अशोक चव्हाण, आदी नेत्यांचीही या विशाल सभेत भाषणे झाली. ऑपरेशन सिंदूर कारवाईतून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सेनादलाने केलेल्या कारवाईतून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर या सभेच्या माध्यमातून संपूर्ण भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पराक्रमी भारतीय सेनादलांचे अभिनंदन करण्यासाठी सरकारसोबत उभा आहे, अशी ग्वाही प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS