
मुंबई - मुंबई महानगर पालिकेपेक्षा छोट्या असलेल्या महानगर पालिकेमध्ये अनुसूचित जातीच्या वॉर्डांचे आरक्षणाचे प्रमाण अधिक आहे. मुंबई महानगर पालिकेत अनुसूचित जातींचे फक्त १५ वॉर्ड आहे. समता परिषद मुंबई च्या वतीने माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी आपल्या शिष्ट मंडळासह सदर तफावत निदर्शनास आणून याबाबत महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती/जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धम्मपाल मेश्राम यांना लेखी निवेदन दिले आहे. मेश्राम यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक घेऊन, तफावत दूर करण्यासाठी योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्रातील प्रमुख महानगर पालिकेतील एकूण वाॅर्डांची संख्या व यां मधील अनुसूचित जाती साठी आरक्षित वार्डांची रचना पाहता, मुंबई महानगर पालिकेत एकूण २२७ वाॅर्ड असून अनुसूचित जाती साठी फक्त १५ वॉर्ड आहेत. नाशिक महानगर पालिकेत १२२ वाॅर्ड, अनुसूचित जाती साठी १८ वाॅर्ड, छत्रपती संभाजी नगर महानगर पालिकेत, ११३ वाॅर्ड, अनुसूचित जाती साठी २२ वाॅर्ड नागपूर महानगर पालिका १५१ वाॅर्ड, अनुसूचित जाती साठी २४ वाॅर्ड, पुणे महानगर पालिका १६२,अनुसूचित जातीसाठी १९ वाॅर्ड आहे. सदर तफावत पाहता, आगामी होणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीवर अन्याय होऊ नये यासाठी विजय (भाई) गिरकर यांनी पुढाकार घेतला आहे.
आपल्या शिष्टमंडळासह अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धम्मपाल मेश्राम व सचिव संजय कमलाकर यांची, त्यांच्या दालनात भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात मुंबईतील यां आरक्षणानुसार अनुसूचित जाती वर्गावर अन्याय होत आहे. आपण संबंधित खात्याच्या प्रमुखांसह संयुक्त बैठक बोलवावी व अनुसूचित जातीवरील अन्याय दूर करावा अशी विनंती केली आहे. मेश्राम यांनी १० जून रोजी, संयुक्त बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेविका समिता कांबळे, ॲड. संदीप जाधव, योजना ठोकळे, विनोद कांबळे आणि विजय पवार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment