राष्ट्रहिताच्या विचारांनी आयटीआयमध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2025

राष्ट्रहिताच्या विचारांनी आयटीआयमध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन




मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निम्मिताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

येत्या सहा जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओ संदेशाद्वारे या व्याख्यानमालेचे उदघाटन होणार आहे. त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआय मध्ये अत्याधुनिक सहा विषयांचे नवे अभ्यासक्रमही सुरु करणार असल्याची माहितीही लोढा यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले नाही, तर प्रभावी प्रशासन, सामाजिक समरसता, जनकल्याण आणि कायद्याचे राज्य निर्माण करून सुराज्य घडवले हे विचार महाराष्ट्राच्या मातीत रुजवले. आजही महाराजांच्या विचारांची समाजाला आणि राष्ट्राला अत्यंत गरज असल्याने कौशल्य विकास विभागाने शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर राज्यव्यापी १०९७ आयटीआय मध्ये व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्ये आणि स्वदेशी विचार हे पंच परिवर्तन संकल्पनेचे मुख्य आधारभूत विषय असून या व्याख्यानमालेत हेच विषय अंतर्भूत करण्यात आले आहेत अशी माहितीही मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. या व्याख्यानामुळे नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल. कायद्याचे पालन केल्याने राष्ट्र समृद्ध होऊन प्रगती साधता येईल. बंधुभाव वाढीस लागल्याने समाजातील भेद दूर होतील. पर्यावरणाचे संवर्धन करून प्रदूषण विरहित स्वच्छ व सुंदर देश उभा राहील. कुटुंब प्रबोधनामुळे कुटुंब व्यवस्थेत शांती, सुसंवाद, सौहार्द निर्माण होईल,असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या उपक्रमात जनतेने ही सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक सतीश सूर्यवंशी, उपस्थित होते.

कौशल्य विकास विभागाने आणलेल्या नव्या खाजगी - सार्वजनिक अर्थात पीपीपी धोरणाला उद्योगक्षेत्राचा चांगला प्रतिसाद लाभत असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून सहा नवे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. यात सौर ऊर्जा तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ, ड्रोन तंत्रज्ञ, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यभरातल्या आयटीआय मध्ये सुमारे १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण मिळणार आहे. या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचे जागतिक दालन उघड होणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS