पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा - मंत्री मंगलप्रभात लोढा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2025

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा - मंत्री मंगलप्रभात लोढा


मुंबई - मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करून शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. वाळकेश्वर येथील कवळे मठ महापालिका शाळेत मंत्री लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. 
     
मंत्री लोढा यांनी शैक्षणिक साहित्य आणि गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी एक सोहळा होऊन अविस्मरणीय ठरावा, या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
       
यावेळी मंत्री लोढा यांनी उपस्थित पालकांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. पालक संघाची महिन्यातून एकदा शिक्षकांसोबत बैठक आयोजित करावी त्यातून अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महा विभूतींनी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला त्यांचे कार्य आणि कर्तृत्व पुढच्या पिढीला कळावे यासाठीही महिन्यातून एकदा शाळांमध्ये विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या. 
     
मंत्री लोढा यांच्या प्रयत्नाने महापालिका शाळांमध्ये आयटीआयच्या निवडक ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुरु असल्याची माहितीही यावेळी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. यापुढे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास मंत्री प्रयत्नशील राहतील, असा दृढ विश्वासही कंकाळ यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला सहायक उपायुक्त मनीष वळंजू, कवळे मठ महापालिका शाळेच्या प्रशासकीय प्रमुख सायली पाटील यांच्यासह पालिकेच्या डी विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS