
मुंबई - मुंबईतील गिरगाव परिसरात सोमवारी ठाकूरद्वार सिग्नलजवळ असलेल्या मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात झाला. भर गर्दीच्या वेळेत रस्ता खचल्याने बेस्ट बसचा अपघात झाला. बस ५ फूट खोल खड्ड्यात अडकली. दरम्यान, या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; पण बेस्ट बसमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर या घटनेमुळे चाकरमान्यांचा खोळंबा झाला.
मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच सकाळी गिरगावमध्ये ९.३० च्या सुमारास ठाकूरद्वार चौकानजीक डॉ. बाबासाहेब जयकर मार्गावरील काही भाग खचला. मेट्रो ३ मार्गिकेवरील गिरगाव स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड्सच्या अगदी जवळून बस जात असतानाच रस्ता खचला. बसचे मागचे एक चाक या खड्ड्यात अडकले. त्यामुळे बस जागीच तिरकी अडकून पडली. परिणामी, बसमधील प्रवाशांना मध्येच उतरावे लागले. सकाळी वर्दळीच्या वेळी रस्त्यातच बस अडकून पडल्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती.
सदर बस १२१ क्रमांकाच्या बसमार्गावरील बॅकबे आगारातील होती. बॅकबे येथून ती जे. मेहता मार्गाच्या दिशेने जात असताना सकाळी ९.३० वाजता ठाकूरद्वार सिग्नलजवळ ही घटना घडली. या घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नाही, असे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे.
No comments:
Post a Comment