
मुंबई - जवळपास वर्षभरापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणा-या या लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनीही घेतला. पण आता केवळ महिलाच नाही, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक पुरुषांनीही घेतल्याचे समोर आले आहे. योजनेत हा मोठा घोटाळा समोर आला आहे.
लाडकी बहीण या योजनेचा लाभ तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतला. त्यांना २१.४४ कोटी रुपये वाटण्यात आले. ऑगस्ट २०२४ पासून ही योजना सुरू झाली. योजनेत लाभार्थ्यांची छाननी करताना हा प्रकार उघडकीस आला. सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटा तपासल्यावर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या. २ लाख ३६ हजार १४ लाभार्थ्यांच्या नावांमध्ये संशय आहे. ते पुरुष असून त्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतला असावा, असा संशय आहे. ज्या १४,२९८ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला, त्यांना दरमहा मिळणारे १५०० रुपये मानधन आता बंद करण्यात आले आहे. योजनेत झालेल्या घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. महिलांच्या योजनेतून पुरुषांनी अर्ज करून पैसे कसे मिळवले, हे शोधण्यासाठी आता कागदपत्रांची छाननी सुरू आहे.
अनेक अपात्र महिला -
नियमानुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नाही. तरीही, २ लाख ८७ हजार ८०३ वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. या महिलांना ४३१ कोटी ७० लाख रुपये मिळाले. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. असे असतानाही, ७ लाख ९७ हजार ७५१ कुटुंबांतील दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यांना १,१९६ कोटी ६२ लाख रुपये मिळाले असल्याचे समोर आले आहे. ६५ वर्षांवरील महिलांना या योजनेतून वगळले जाईल. त्यामुळे सरकारचे वर्षाला ५१८ कोटी रुपये वाचणार आहेत.
पुरुष असूनही दिली महिलांची नावे
या यादीतील काही नावांबद्दलही संशय असून पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन योजनेचा लाभ घेत ते पैसे मिळवल्याचीही शंका आहे. याच नावांची छाननी करण्याचे काम सध्या सुरू असून १४ हजार २८९ पुरुष लाडकी बहीणच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचे उघड झाल्यावर आता त्यांना मिळणारे १५०० रुपये बंद करण्यात आले आहेत.
सरकारी कर्मचारी महिलांनीही मारला डल्ला -
यापूर्वीही लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले, अनेक तक्रारीदेखील आल्या. राज्यातील तब्बल २ हजारांहून अधिक सरकारी कर्मचा-यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले होते.

No comments:
Post a Comment