
मुंबई - राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने त्याला दि. २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परिक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. (HSC Exam Forms)
राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परिक्षा अर्ज भरण्याची उद्या दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी शेवटची मुदत आहे. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परिक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण मंत्री भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परिक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

No comments:
Post a Comment