
मुंबई - राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणांसाठी आलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच स्टार्टअप्सच्या मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. इतर राज्यांमध्ये स्टार्टअप वाढीसाठी प्रयत्न होत असताना महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी कायम राखली पाहिजे. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारणीसाठी गतीने कार्यवाही करून पायाभरणी लवकरच करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या राज्य नाविन्यता सोसायटीच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, आयुक्त लहूराज माळी, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. बी. वेणुगोपाल रेड्डी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य नाविन्यता सोसायटी अधिक सक्षम करण्यासाठी आलेल्या सूचनांचा विचार करून यासाठी प्रभावी कार्यपद्धती राबवावी. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी प्रकल्प कालबद्ध नियोजनानुसार पूर्ण व्हावा. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ हे समाजात वैविध्यपूर्ण बदल घडविणारे असून उद्योजकतेला व स्टार्टअप्सना नवसंजीवनी देणारे ठरेल.
स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार – कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा
कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, नव्या धोरणांतर्गत मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड उभारण्यात येईल. शासनाकडे नोंद असलेल्या ३० लाख तंत्रशिक्षित युवक-युवतींना ईमेलद्वारे एआय परीक्षेत सहभागी केले जाईल. त्यातून पाच लाख उमेदवारांची निवड होईल. पुढील चाळणीनंतर १ लाख उमेदवारांना स्पर्धा, हॅकेथॉन व चाचण्यांतून संधी दिली जाईल. अंतिम टप्प्यात २५ हजार निवडक उमेदवारांना तांत्रिक सहाय्य, आर्थिक मदत व प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक व स्टार्टअप्स घडविण्याचे उद्दिष्ट आहे.
महिला सक्षमीकरणासाठी महिला-केंद्रित इनक्यूबेटर, विशेष आर्थिक मदत, तसेच लेदर इन्स्टिट्यूट, वांद्रे येथे “मिशन इनोव्हेशन २०४७” या नावाने जागतिक दर्जाचे केंद्र स्थापन होणार आहे. तसेच ग्लोबल महाराष्ट्र इनोव्हेशन समिट आयोजित करून प्रमुख २० जागतिक प्रवर्गांसोबत भागीदारी करीत ₹५०,००० कोटींच्या थेट परदेशी गुंतवणुकीचे (FDI) उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
स्टार्टअप पॉलिसीचे सकारात्मक परिणाम – डॉ. रघुनाथ माशेलकर
ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, महाराष्ट्राने तयार केलेली स्टार्टअप पॉलिसी २०२५ ही अत्यंत नाविन्यपूर्ण असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. बोईंग कंपनीसोबतचा सामंजस्य करार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र हा स्टार्टअप्ससाठी हॉटस्पॉट ठरत आहे.
प्रविण परदेशी यांनी सांगितले की, राज्य धोरणामुळे निधी उपलब्धता सुलभ झाली असून स्टार्टअप्सच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, एनसीआय इनक्यूबेटर केंद्रामुळे वैद्यकीय क्षेत्रातही नवे प्रयोग घडत आहेत. अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी सोसायटीच्या कार्ययोजना व सद्यस्थितीचा आढावा सादर केला.
यावेळी महाराष्ट्र प्राणी व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. एस. डी. इंगोले, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे शास्त्रज्ञ शामलन रेशमवाला, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे महासंचालक अजित मंगरुळकर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे संचालक प्रा. सुनील भागवत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईचे प्राध्यापक प्रा. सुशील शर्मा, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरचे प्राध्यापक डॉ. शीतल चिद्दरवार, आय. आय. टी. मुंबईचे प्राध्यापक निशांत शर्मा, कॉर्नरस्टोन व्हेंचर पार्टनर्स, मुंबईचे व्यवस्थापकीय भागीदार राजीव वैष्णव आणि एम. सी. सी. आय. ए. (MCCIA) चे महासंचालक प्रशांत गिरबाने, ‘आयआयएसईआर’ पुणे, व्हीएनआयटी नागपूर, विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment