Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

Share This

मुंबई - मुंबई आणि उपनगर परिसराला रविवारी (दि. १४) रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले असून सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढला. मुंबईत पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पावसामुळे शहरात वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन, किंग्ज सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची कोंडी झाली. वडाळ्याजवळ मोनोरेल अडकली असून अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी, गोखले पुलाकडे वाहनं वळवावी लागली आणि तेथेही प्रचंड गर्दी झाली. भायखळा, महालक्ष्मी आणि किंग्ज सर्कलसह अनेक भाग पाण्याखाली गेले असून नागरिकांना गुडघ्यापर्यंत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. परिस्थिती लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नये, अशी सूचना दिली आहे.

मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेली ही संततधार अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील तीन तासांत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांसाठी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

भरपावसात मोनोरेल पुन्हा बंद - 
पावसाचा जोर वाढला असतानाच मोनोरेल प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला. चेंबूरच्या दिशेने निघालेली मोनोरेल वडाळा परिसरात अचानक बंद पडली. यामुळे अनेक प्रवासी रेलमध्येच अडकले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर चेंबूरकडून आलेल्या दुसऱ्या मोनोरेलमध्ये प्रवाशांना बसवण्यात आले. मोनोरेलमध्ये बिघाड होण्याची ही महिन्याभरातील तिसरी घटना आहे. तांत्रिक बिघाड या अडथळ्यामागील प्रमुख कारण असल्याचे समजते. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने मोनोरेल थांबली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडगे महाराज स्टेशनहून चेंबूरकडे जात असताना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुकुंदराव आंबेडकर रोड जंक्शनजवळ मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages