
मुंबई - आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला अखेर नऊ महिन्यानंतर कायमस्वरूपी महाव्यवस्थापक मिळाला आहे. राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ. सोनिया सेठी यांना बेस्ट महाव्यवस्थापकपदाची जबाबदारी सोपवली. सेठी यांनी बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. तोट्यात असलेल्या बेस्टसमोर अनेक आव्हाने आहेत. या नियुक्तीमुळे बेस्टच्या कामकाजाला स्थिरता मिळेल अशी अपेक्षा आहे.
२०२३पासून चार महाव्यवस्थापक झाले. यातील काही कायमस्वरूपी म्हणून, तर काहींना तात्पुरता कार्यभार देण्यात आला होता. अखेर सेठी यांची कायमस्वरूपी महाव्यवस्थापकपदी नेमणूक करण्यात आली. ४ जून २०२१ ते ४ जून २०२३ कालावधीत आयएएस अधिकारी लोकेशचंद्र यांनी बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर ५ जून २०२३ ते १३ मार्च २०२४ पर्यंत विजय सिंगल या पदावर होते. १४ मार्च २०२४ पासून अनिल डिग्गीकर यांची कायमस्वरूपी महाव्यवस्थापकपदी नियुक्ती झाली होती.
डिग्गीकर यांची बदली झाली आणि डॉ. हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्तीचे आदेश २४ डिसेंबर २०२४ला काढण्यात आले. या आदेशानंतरही नवे महाव्यवस्थापक रूजू झाले नाहीत. त्यांची कालांतराने मंत्रालयात बदली करण्यात आली. त्यानंतर बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडेही आला होता. जोशी यांच्याकडून नंतर विशेष कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांच्याकडे फेब्रुवारी २०२५ मध्ये बेस्टचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर, श्रीनिवासही ३० जुलैला निवृत्त झाले.

No comments:
Post a Comment