
केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्याने वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे वाहन खरेदीत वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. मुंबईत तब्बल 10,541 नवीन वाहनांची नोंदणी झाली असून यात दोन चाकी, चार चाकी आणि व्यावसायिक वाहनांचा मोठा समावेश आहे. गेल्यावर्षी दसऱ्याला 9063 वाहनांची खरेदी झाली होती.
वाहन विक्रेते आणि शोरूम धारकांच्या माहितीनुसार, यावर्षी उत्सव काळात ग्राहकांची गर्दी लक्षणीय वाढली. अनेकांनी दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून नवीन कार, बाईक तसेच इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केली. गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असून दसऱ्याच्या खरेदीत त्याला विशेष प्रतिसाद मिळाला आहे.
वाहन विक्रेत्यांच्या मते, आकर्षक ऑफर्स, बँक कर्जावरील सवलती आणि सणासुदीची परंपरा यामुळे वाहन खरेदीचा आकडा विक्रमी झाला आहे. विशेष म्हणजे यंदा चारचाकी गाड्यांच्या खरेदीत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दोन चाकी वाहनांना पारंपरिक प्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळाला.
मुंबईतील रस्त्यांवर नव्या वाहनांचा ताफा उतरल्यानंतर दसरा खऱ्या अर्थाने "यश आणि समृद्धीचा सण" ठरल्याचे ग्राहकांनी सांगितले. आगामी दिवाळी आणि ख्रिसमस हंगामामुळे वाहन विक्री आणखी वाढण्याची शक्यता वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment