महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांची विराट एकजूट! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांची विराट एकजूट!

Share This

मुंबई - धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने आज बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा या प्रमुख मागणीसाठी मुंबईतून ऐतिहासिक मोर्चा निघाला. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मार्गे पार पडला. (Great unity of Buddhists for the liberation of Mahabodhi Mahavihar)

रखरखत्या उन्हात निघालेल्या या मोर्चात राज्यभरातील आंबेडकरी व बौद्ध जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून ऐक्याचे शक्तिप्रदर्शन केले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व रिपब्लिकन गट, बौद्ध संघटना आणि सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र आल्याचे चित्र दिसले.

उपस्थिताना मार्गदर्शन करताना रामदास आठवले म्हणाले की, “केल्याशिवाय ऐक्याचा प्रहार मुक्त होणार नाही, महाबोधी महाविहार मुक्त झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही. मी मंत्री असलो तरी आंबेडकरी कार्यकर्ता आहे. म्हणूनच मी नामांतरासाठी मोर्चे काढले, आणि आज महाबोधी मुक्तीसाठी लढतोय. बिहारमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो, बी.टी. ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावेच लागेल.”

आठवले यांनी पुढे म्हणाले की, “रिपब्लिकन ऐक्य होणे ही काळाची गरज आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे आणि मी या ऐक्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील समाजाच्या एकजुटीसाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे.”

या मोर्चात प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, सुरेश माने, सीमा आठवले, सुलेखा कुंभारे, खासदार वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार राजकुमार बडोले, आमदार संजय बनसोडे, आमदार बालाजी किणीकर, आमदार संतोष बांगार, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले.

पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, भंते विनाचार्य, भदंत हर्षवोधी, आकाश लामा आदी भिक्खू संघाच्या उपस्थितीने मोर्च्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान मिळाले. 

मोर्चातील महत्त्वाच्या मागण्या - 
➡ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देणे
➡ बी.टी. ॲक्ट रद्द करणे आणि मंदिर व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती देणे
➡ बौद्ध एकजुटीसाठी सर्व रिपब्लिकन गटांनी एकत्र येणे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages