ऐन दिवाळीत वीज ग्राहकांना महावितरणचा मोठा झटका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऐन दिवाळीत वीज ग्राहकांना महावितरणचा मोठा झटका

Share This

 

मुंबई - ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना महावितरणने दरवाढीचा मोठा झटका दिला आहे. इंधन समायोजन शुल्क लागू केल्यामुळे ऑक्टोबर २०२५ च्या वीज बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ होणार आहे. या दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. महावितरणने १ ऑक्टोबर २०२५ रोजी एक परिपत्रक जारी करत सप्टेंबर महिन्यातील वीज वापरासाठी हे शुल्क आकारण्याचे निर्देश दिले आहेत.

महावितरणने सांगितली दरवाढीची कारणे : महावितरणच्या म्हणण्यानुसार, वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून उच्च दराने वीज खरेदी करावी लागली आहे. याशिवाय, अधिक उत्पादन खर्च असलेल्या वीज युनिट्सचा वापरही करावा लागला आहे. यामुळे इंधन समायोजन शुल्क लागू करणे आवश्यक ठरले. मात्र, महावितरणने पुढील काही वर्षांत वीज दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महावितरणने वीज वापरानुसार खालीलप्रमाणे दरवाढ जाहीर केली आहे.

नवे वीज दर (प्रति युनिट)
१ ते १०० युनिट : ३५पैसे प्रति युनिट
१०१ ते ३०० युनिट : ६५ पैसे प्रति युनिट
३०१ ते ५०० युनिट : ८५ पैसे प्रति युनिट
५०० युनिटपेक्षा जास्त : ९५ पैसे प्रति युनिट


ग्राहकांवर काय परिणाम होणार?
ही दरवाढ विशेषत: दिवाळीच्या काळात ग्राहकांसाठी मोठा आर्थिक फटका ठरणार आहे. घरगुती ग्राहकांना वीज बिलात वाढ झाल्याने खिशावर अतिरिक्त ताण येईल. व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांवरही याचा परिणाम होणार आहे. कारण त्यांचा वीज वापर सामान्यत: जास्त असतो. विशेषत: ५०० युनिटपेक्षा जास्त वापर करणा-या ग्राहकांना प्रति युनिट ९५ पैशांची सर्वाधिक वाढ सहन करावी लागणार आहे.

भविष्यात दर कमी होणार?
महावितरणने दावा केला आहे की, ही दरवाढ तात्पुरती आहे. पुढील काही वर्षांत वीज दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांना या वाढीव बिलांचा सामना करावा लागेल. ही दरवाढ पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages