
मुंबई - दादर प्लाझा सिनेमा बसस्टॉपजवळ शनिवारी उशिरा रात्री बेस्ट बसच्या झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री सुमारे ११.३० वाजता झाला. (Best Bus Accident)
या घटनेत बेस्टची मातेश्वरी वेटलीज डेपोची बस (क्रमांक MH01DR4654, बस क्र. 7652, मार्ग 169, सिरीयल क्र. 36) आणि एक २०-सीटर टेंपो ट्रॅव्हलर एकमेकांना धडकले. बस वरळी डेपोतून प्रतिक्षानगर डेपोच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दादर टी.टी.च्या दिशेने येणारा टेंपो अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन बसच्या उजव्या पुढील टायरला जोरात धडकला. टक्कर इतकी जोरदार होती की बस डावीकडे झुकत पुढे गेली आणि प्लाझा बसस्टॉपवर उभ्या प्रवाशांवर आणि पादचाऱ्यांवर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात शहाबुद्दीन (३७) या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर राहुल अशोक पडाले (३०), रोहित अशोक पडाले (३३), अक्षय अशोक पडाले (२५) आणि विद्या राहुल मोटे (२८) हे चौघे गंभीर जखमी झाले. जखमींना बस कंडक्टर आणि उपस्थित पोलिसांनी तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शहाबुद्दीनला मृत घोषित केले असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर टेंपोने बसला धडक दिल्यानंतर एक टॅक्सी आणि एका टुरिस्ट कारलाही जोरदार धक्का दिला, ज्यामुळे दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली. बसचा पुढील टायर फुटला आणि समोरील काच पूर्णपणे फुटली. या घटनेची नोंद शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघातात सामील बसला वडाळा डेपोमध्ये आरटीओ तपासासाठी नेण्यात आले आहे. बेस्ट प्रशासनाच्या वतीने अपघात अधिकारी पोंडे, तसेच निरीक्षक शिर्साट आणि चासकर (मातेश्वरी वेटलीज डेपो) तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment