
मुंबई/कर्जत - घरासाठी बचत मोडून, बँकांकडून कर्ज घेऊन स्वप्नातील घर बुक केलं... पण आज जवळपास 10 वर्षांनंतरही घराच्या चाव्या मिळाल्या नाहीत! अशी व्यथा मांडली आहे Xrbia Vangani (कड्याचपाडा, ता. कर्जत) प्रकल्पातील शेकडो घरखरेदीदारांनी. आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनही करण्यात आलं.
2014-15 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत घर बुक केलेल्या या खरेदीदारांना अजूनही त्यांच्या घरांची प्रतीक्षा आहे.
2019 पर्यंत काम सुरळीत सुरु होतं, पण कोविडनंतर बांधकाम पूर्णपणे थांबलं. आजही काम अपूर्ण आहे.
खरेदीदारांची व्यथा:
“आम्ही EMI आणि भाडं दोन्ही भरतोय, पण घर अजून मिळालं नाही. बिल्डरच्या चुकीमुळे आमची PMAY सबसिडीही गेली. ती सरकारने आम्हाला परत द्यावी,” अशी मागणी Xrbia Welfare Association चे अध्यक्ष किशन वासाला यांनी केली.
NCLT प्रक्रियेत प्रकल्प:
ऑगस्ट 2024 पासून प्रकल्प NCLT (National Company Law Tribunal) प्रक्रियेत आहे. बिल्डरच्या चुका आणि इतर कंपन्यांच्या तक्रारीमुळे न्यायालयाने विकास कियानी यांना Resolution Professional (RP) म्हणून नेमले आहे. मात्र, ARCIL कडील मंजुरीत अडथळ्यांमुळे प्रकल्प ठप्प आहे.
खरेदीदारांच्या मुख्य मागण्या:
* सर्वांना लवकरात लवकर घर मिळावे
* बिल्डरच्या चुकीमुळे गेलेली PMAY सबसिडी परत मिळावी
* आतापर्यंत दिलेल्या भाड्याची नुकसानभरपाई द्यावी
* बांधकाम सुरू होईपर्यंत EMI सवलत द्यावी
* ARCIL, L&T आणि बिल्डर यांच्या बैठकीत सरकारने हस्तक्षेप करावा
खरेदीदारांचे म्हणणे आहे की, “आमच्याकडे वकील ठेवण्याची ताकद नाही, ऑनलाइन NCLT प्रक्रिया समजणं अवघड आहे. सरकारने पुढाकार घेऊन आम्हाला न्याय द्यावा.”
शेवटचा इशारा:
“जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, तर आम्ही पुढील EMI भरणार नाही. सरकारने बँकांना आदेश द्यावा की नोटीस किंवा दबाव आणू नये,” अशी मागणीही संघटनेने केली आहे.

No comments:
Post a Comment