
मुंबई - जोगेश्वरी (पूर्व) येथील मजासवाडी परिसरात महाराज भवनाजवळील पुनर्विकासाचे काम सुरू होते. या कामादरम्यान आज दुपारी सिमेंटचा ब्लॉक पडून झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून (MFB) मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी १२:५२ वाजता घडला. शिवकुंज या खाजगी इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामात (डेव्हलपर – मजास श्रद्धा लाईफ) सिमेंटचा एक जड ब्लॉक खाली कोसळला. हा ब्लॉक रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला लागला.
जखमी महिलेला तात्काळ एचबीटी ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, डॉक्टर उज्मा (AMO – HBT हॉस्पिटल) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेला रुग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. मृत महिलेचं नाव संस्कृती अनिल अमीन (वय २२ वर्षे) असं आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, डेव्हलपर आणि कामगारांशी चौकशी सुरू आहे. अग्निशमन दल आणि पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, इमारतीच्या सुरक्षिततेचा आणि कामकाजाच्या नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी सुरू आहे.

No comments:
Post a Comment