रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्षपद मायावती तर कार्याध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे - रामदास आठवले

मुंबई । प्रतिनिधी - सामाजिक, राजकीय संघटना एका बाजूला तर मंत्रिपदासाठी रिपाई आठवले गट एका बाजूला असे चित्र आंबेडकरी समाजात निर्माण झाले आहे. आंबेडकरी समाजाकडून एकीकृत रिपब्लीकन पक्ष निर्माण व्हावा म्हणून सातत्याने मागणी केली जात आहे. मात्र नेते एकत्र येत नसल्याने एकीकृत रिपब्लिकन पक्ष निर्माण होताना दिसत नाही. अश्या परिस्थितीत केंद्रीय मंत्री व रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याचे राष्ट्रीय अध्यक्षपद मायावती तर कार्याध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे असे आवाहन केले आहे.


महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवरील अभिवादन सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी बोलताना रिपाइंच्या विविध गटांचे सर्व नेते आपलेच आहेत. ते सर्व समाजासाठी काम करीत आहेत. पण ते कधी एकत्र येणार ? असा प्रश्न उपस्थित करता सर्व नेत्यांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपाइं स्थापन केला पाहिजे. एकीकृत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्षपद बहण मायावती यांनी तर राष्ट्रीय कार्याध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे असे आवाहन आठवले यांनी केले. एकीकृत रिपाईत मी कार्यकर्त्याच्या रूपाने काम करण्यास तयार आहे असे आठवले म्हणाले. सर्व समाजाचा एकच पक्ष असला पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी खास आपल्या शैलीत "महापारिनिर्वाणाला वर्ष झाली एकसष्ट; पण कधी होईल जातीवाद नष्ट; पुढील वर्ष येत आहे बासष्ट; जातीवाद संपविण्यासाठी कधी घेणार तुम्ही कष्ट" अशी चारोळी सादर करत आपण ज्या भाजप आणि आरएसएस बरोबर सत्तेत आहोत त्यांनाच जातीवाद कधी संपणार असा सवाल उपस्थित केला आहे. जातीवाद संपविण्यासाठी बुद्धांच्या अहिंसेच्या मार्गाने लढणारे एकमेव महासूर्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत असे आठवले म्हणाले.

इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती राजकुमार बडोले यांनी दिली. चैत्यभूमी येथे भिमसैनिकांची वादळामुळे काही प्रमाणात गैरसोय झाली त्याबद्दल बडोले यांनी राज्य शासनातर्फे दिलगिरी व्यक्त केली. यावेळी विचार मंचावर भदंत राहुल बोधी महाथेरो, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, सीमा आठवले, जित आठवले, राज्य कार्यध्यक्ष बाबुराव कदम, माजी आमदार सुमंतराव गायकवाड, अनिल गोंडाने, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले. यावेळी रिपाइंचे अनेक मान्यवर उपस्थित होते. ओक्खीच्या वादळावर भीमसैनिकांच्या निळ्या वादळाने मात केल्याबद्दल सर्व वक्त्यांनी भीमसैनिकांचा कौतुक केले.
Previous Post Next Post